आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!
अपरिचित वाघोली, फुलगावचा देखणा घाट आणि तुळापूर बोलू लागलं !! सवयीनं आठवड्यात एखाद्या दिवशी उषःप्रहरी उठावं आणि अंधारातच एकुटवाणं... नाही नाही !! रानभुलीसवे निघावं. (रानभुली कोण? विसरलात? मग आधी हे वाचा !!) कुठं जायचं ते रानभुलीला नेमकं ठाऊक असतं. अर्ध्या-पाऊण तासात ती मला, माझ्या आवडत्या नेमक्या टेकाडापाशी पोहचवते. आम्ही दोघंही मग अर्ध टेकाड चढून नेहमीच्या धोंड्यावर कोणाची तरी वाट पाहत बसतो. अजूनही अंधाराचंच साम्राज्य असतं. वारा दमून-भागून झोपलेला असला तरी त्याची उणीव हवेतला गारवा भरून काढत असतो. समोर भला मोठा काळसर निळा किंतानाचा पट (कॅनव्हास) क्षितीजापार पसरलेला असतो. त्यावर उगा कोण्या खोडकराने कुंचला फटकारून उडवलेल्या लहान-मोठ्या पांढुरक्या ठिपक्यांसारख्या चांदण्या लुकलुकत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे गावातले काही दिवे उगाच ऐट मिरवत असतात. आणि मग काही क्षणांतच त्याची चाहूल लागते. तो येतो... पांढरा शुभ्र ढगळ अंगरखा, तितकेच शुभ्र डोई-दाढीचे लांबसडक केस, बारीक पाणीदार डोळे, चेहर्यावर सुरकुत्यांचं जाळं, तिच गत हातांची आणि लांबसडक बोटांची !! वय किती असावं? माहीत नाही ...