एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन
तसं पाहिलं तर ह्या विषयावर काही लिहावं, असा काही माझा विचार नव्हता. नेहमीप्रमाणे मी, माझा एक सायकलानुभवच लिहायला बसलो होतो पण विचारांनी, मनाचा आणि हातांचा ताबा घेतला आणि सायकालानुभव बाजूला ठेऊन कागदावर वेगळीच आणि अनपेक्षित अक्षरं उमटायला लागली. मग मीही स्वतःला विचारांच्या आधीन केलं आणि विचार हातांकडून काय लिहून घेतात ते निमूटपणे पाहत राहिलो. त्यातूनच ह्या एका वेगळ्याच प्रवासवर्णनाचा जन्म झाला. मागे एकदा, माझ्या एका लिखाणात मी म्हणालो होतो की, चराचर ह्या संकल्पनेत स्थान असलेल्या कुठल्याही अचल गोष्टीला "निर्जीव" म्हणणं, मला तरी रुचत नाही. अगदी बालपणापासून ते आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली कुठलीही अचल गोष्ट (ठिकाण / निसर्गाचा घटक / वस्तू इ. ) ही "सजीव च " आहे असं मी मानत आलो आहे. त्यातल्याच काही गोष्टींशी तर अगदी (सजीवांपेक्षा काकणभर जास्तच) आपुलकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे " सायकल". सायकलला नुसतं "सायकल" असं म्हणण्यात, मला एक प्रकारचा निर्जी...