ओढाळ वासरू रानी आले फिरू

मोरगिरी, संग्रामदुर्ग, कैलासगड, ढवळगडावरचा उल्कावर्षाव आणि कऱ्हेपठारावरचं प्राचीन शिल्पवैभव असं बरंच काही !!!

ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडुनिया
कानांमध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ
मोकाट मोकाट, अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे

तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पुन्हा पाचवीचा अभ्यास चालू केला की काय? लेखनाची सुरुवात पद्याने करायचा नवीन छंद जडलाय का? वगैरे वगैरे... पण खरंच, मला २०२० चं वर्ष, सरता सरता जे काही आनंद देऊन गेलं त्याचा लेखन-प्रपंच मांडायला घेतला आणि कवी अनिलांचं अवखळ वासरू डोळ्यासमोर उड्या मारायला लागलं.

पुणे जिल्ह्यात मला ज्ञात असलेले उणे-अधिक बत्तीस तरी गिरीदुर्ग आहेत. त्यातले तीन दुर्ग (मोरगिरी, कैलासगड आणि ढवळगड) वगळले तर बाकी दुर्गांना आजपर्यंत किमान एकदा तरी भेट देऊन झाली आहे. पण उर्वरित तीन दुर्ग पाहण्याचा योग काही येत नव्हता. ठरवल्याप्रमाणे २०२० च्या सुरुवातीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातले तीन दुर्ग (मांजरसुभा, नगरचा भुईकोट व जामगावचा भुईकोट) आणि नगरमधील काही वास्तू पाहून आलो, पण वेध लागले होते ते पुणे जिल्ह्यातले उरलेले तीन दुर्ग पाहण्याचे.

"काहीही झालं तरी ह्या वर्षाच्या सरत्या पावसाळ्यात, हे उरलेले तीन दुर्ग पाहायचेच" अशी भीष्म-प्रतिज्ञा करून सिद्ध होतो न होतो तोच समस्त मानवजातीवर जणू सुलतानढवा करण्यासाठी दबा धरून बसलेल्या विषाणूचा वेढा पडला आणि सक्तीचा बंदिवास नशिबी आला. गनिमीकाव्यानेही सुटकेला काही वाव उरला नाही तेव्हा ह्या सक्तीच्या बंदिवासाचं संधीत कसं रूपांतर करता येईल असा विचार सुरु झाला आणि त्यातून जन्माला आलं नियोजनबद्ध "महाराष्ट्राटन" !!! पण हा काही आत्ताच्या लेखनाचा विषय नाही, ह्यावर पुन्हा कधीतरी बोलू.

असो !!! तर, ह्या विषाणूचा आणि त्याबरोबर जोरदार पावसाचाही वेढा व्यवस्थित उठेपर्यंत, नोव्हेंबर महिना उजाडला आणि पुन्हा एकदा योजलेल्या दुर्गभ्रमंतीबद्दलच्या आशा पल्लवीत झाल्या. वर्षातल्या उरलेल्या दोन महिन्यांत तीन गिरीदुर्गांपैकी निदान दोन दुर्ग (मोरगिरी व कैलासगड) आणि एखाद्या दिवशी सायकलवारीने चाकणचा संग्रामदुर्ग पाहून येऊ, असं नियोजन केलं आणि माझ्या डोंगरभावांना (आदित्य आणि दुर्गेश) हाळी घातली.

उंबरगडातल्या (घराचा उंबरा) बंदिवासातून एकदाची सुटका झाली आणि ८-नोव्हेंबरला आदित्यसोबत मोरगिरी सर झाला. मोरगिरी हे पवन आणि कोरबारस ह्या दोन मावळांच्या हद्दीवरचं एका उत्तुंग डोंगरावर वसलेलं टेहाळणीचं ठाणं. एकाच वेळी दोन्ही मावळांवर नजर ठेवायला आणि कोकणातून वर येणाऱ्या पायमोडी, सव, कोराई, अनघाई अश्या घाटवाटांवर लक्ष ठेवायला ह्या सारखी दुसरी जागा नाही. डोंगराच्या अर्ध्या-पाऊण उंचीवर भलं थोरलं पठार पण तरी वसाऊ दुर्ग म्हणून हा डोंगर कधी नावारूपाला आला नाही. डोंगराच्या सर्वोच्च कातळाच्या उदरात एका अनगड गुहेत वसलेल्या जाखमातेवर इथल्या रहाळाची श्रद्धा. पठारापर्यंत पोहचायला मध्यम आणि कातळकड्याशी पोहचायला किंचित अवघड अशी ह्या दुर्गाची श्रेणी म्हणता येईल. त्यातल्या त्यात सरता पावसाळा हीच काय ती ह्या जागेला भेट देण्याची सुरक्षित वेळ. जवळपास दहा महिन्यांच्या विरहानंतर माझा सखा-सह्याद्री मला भेटला होता. त्याला पाहून हर्षभराने डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या (चित्र १).

चित्र १: दहा महिन्यानंतर सह्याद्रीची भेट - मोरगिरी (चित्रकृपा: आदित्य जोशी)

परतीच्या वाटेवरच वडगाव (मावळ) येथील मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास आणि महादजी शिंदे व नाना फडणवीसांच्या युद्धकौशल्याच्या स्मृती जागवणाऱ्या पहिल्या इंग्रज-मराठे युद्धस्मारकालाही भेट दिली (चित्र २). वडगावकरांचं उत्सवाचं कारण होऊन बसलेल्या इष्टुर फाकड्याचंही स्मारक ओघाने पाहणं झालंच.

चित्र २: पहिले इंग्रज-मराठे युद्ध स्मारक - वडगाव

आठवड्याभरानंतरच, म्हणजे १५-नोव्हेंबरला संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर मंदिराची सायकलवारी झाली. फिरंगोजींच्या पराक्रमाला पुन्हा एकदा मनाचा मुजरा झडला (चित्र ३). चक्रेश्वरजवळच्या उपेक्षित कूर्मावतार सदृश मूर्तीला आणि यज्ञवराह मूर्तीला काही क्षण नीट न्याहाळलं. यज्ञवराह म्हणजे विष्णूच्या वराह अवताराची संपूर्ण वराह स्वरूपातली मूर्ती. मूर्तीतील बारकावे विषयातील आवड असणाऱ्यांनी आवर्जून पहावे असेच आहेत (चित्र ४). (संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वरबद्दल सखोल माहिती इथे पहा)

चित्र ३: संग्रामदुर्ग - चाकण

चित्र ४: यज्ञवराह - चक्रेश्वर - चाकण

नियोजनाप्रमाणे नोव्हेंबर संपता संपता कैलासगड भेटीचाही योग जुळून आला. ३०-नोव्हेंबरला दुर्गेशच्या सोबतीने कैलासगडवारीही पूर्ण झाली. मोरगिरीप्रमाणेच कैलासगडही टेहाळणीचंच एक ठाणं (चित्र ५). मध्ययुगीन काळात मुळशी-पौड खोऱ्याचा पहारेकरी म्हणून ह्या दुर्गाची नेमणूक झाली खरी पण गडाच्या पोटातलं खांबटाकं ह्या पहारेकऱ्याच्या प्राचीनतेची साक्ष देतं आणि इतकंच नाही तर पायथ्याच्या वाड्या-वस्त्यांची तहान इतका काळ लोटला तरी आजही भागवतं. मुळशी धरणाच्या जलफुगवट्यामुळे आज आडबाजूला पडलेल्या आणि सोप्प्या श्रेणीची चढाई असलेल्या कैलासगडावरून दिसणारं तैलबैला, कोरीगड, मोरगिरी आणि मुळशी जलफुगवट्याचं दृश्य सह्याद्रीच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला भाग पाडतं (चित्र ६).

चित्र ५: कैलासगड चढाई

चित्र ६: कैलासगडावरून दिसणारा मुळशी धरणाचा जलफुगवटा

एकाच महिन्यात दोन गिरिदुर्ग आणि एक भुईकोट पाहून झाले. आता राहिला ढवळगड. मनाशी विचार केला की हा महिना भरपूर दुर्गसुख मिळालं आहे, तेव्हा ढवळगड पुढच्या पावसाळ्यासाठी शिल्लक ठेवुयात. पण वर्षाच्या सुरुवातीला मी केलेली भीष्म-प्रतिज्ञा माझ्यापेक्षा बहुदा माझ्या नशिबानेच फार मनावर घेतली होती. दुर्गेशचा सांगावा आला. मिथुनराशीचा उल्कावर्षाव पाहायला ढवळेश्वरावर जायचं का? ढवळेश्वर म्हणजेच ढवळगड. स्वतःहून चालून आलेल्या ह्या दुग्ध-शर्करायोगाला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. परिसराचा नकाशा डोक्यात तयारच होता. नुसत्या दुग्ध-शर्करायोगात जणू केशराची भर घालून एक योजना आखली आणि दुर्गेशला उलट सांगावा धाडला. गडी त्याच्या दोन मित्रांसहित तयार झाला.

ठरलेला दिवस उगवला, १२-नोव्हेंबरला संध्याकाळी निघून उरुळी कांचन गाठलं. गावातच जेवण उरकून रात्रीच्या अंधारातच शिंदवणे घाटमार्गे ढवळगड पायथा गाठला. पंधराच मिनिटांच्या चढाईने पडक्या तटात शिरल्यावर गडावरील ढवळेश्वर महादेवाचं प्रशस्त राऊळ समोर आलं. पाठपिशव्या उतरवून गाभाऱ्यातल्या प्रसन्न वातावरणात जाऊन ढवळेश्वराला दंडवत घातला. उल्कावर्षाव पाहण्यासाठी देवळाबाहेर उघड्यावरची जागा निश्चित केली आणि चटया अंथरून पहुडलो. ढगांनी झाकोळलेलं आकाश मोकळं व्हावं म्हणून खगोलदेवतेला साकडं घातलं आणि तासाभरापुरतं का होईना, ते खगोलविश्व आमच्यावर प्रसन्न झालं. तेवढ्या तासाभरात अश्विनीपासून - पुनर्वसूपर्यंतची नक्षत्रे आणि काही तारकासमूहांची ओळख सवंगड्यांना करून दिली. त्यादरम्यानच सर्वांनी मिळून चार एक उल्कांची नोंदही केली. आमच्या आधी खगोलदेवतेलाच जणू झोप आली आणि पुन्हा ती ढगांची दुलई ओढून झोपी गेली. नाईलाजाने आम्हीही मग आमच्या पथाऱ्या देवळात हलवल्या आणि गप्पाष्टके उरकून झोपी गेलो.

पहाटे थंडीमुळे नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. आकाश पाहावं म्हणून राऊळाच्या दरवाज्यातून बाहेर येताना समोरच पूर्वक्षितिजावर चंद्र आणि शुक्र जणू जोडीने वर येत होते. जणू हे दृश्य पाहण्यासाठीच थंडीने झोपेतून लवकर उठवलं होतं. सर्वांना ते दृश्य दाखवलं. क्षितिज जसं उजळण्याच्या तयारीत आहे असं जाणवलं तसं पुन्हा एकदा गाभाऱ्यात जाऊन ढवळेश्वराला दंडवत घातला आणि पाठपिशव्या भरून सगळे आजच्या प्रवासाला तयार झालो. सूर्योदयापूर्वीच्या उजेडातच लहान विस्ताराचा गड फिरून पाहिला (चित्र ७) आणि उतरण्यासाठी म्हणून तटातून बाहेर पडलो तोच समोर सूर्यनारायण हजर (चित्र ८ व ९). त्या बिंबरूपासमोर आपोआपच हात जोडले गेले.
चित्र ७: माचीवरून ढवळगडाचा तट आणि देऊळ

चित्र ८: नित्य सूर्योदय पाहणारा गड-गणपती

चित्र ९: सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहू शकणारा दुतोंड्या गड-मारुती

काहीच क्षणांत गाड्यांपाशी पोहचलो आणि ढवळगडाला रामराम करून पायथ्याच्या आंबळे गावात आलो. आंबळे गावात सरलष्कर दरेकरांचे वाडे आणि काही मंदिरं ह्यासारख्या देखण्या वास्तू उभ्या आहेत (चित्र १०). त्या पाहून सुपे गावाच्या दिशेने प्रवास सुरु केला.

चित्र १०: सरलष्कर दरेकर वाडा - आंबळे

पाहण्याचं नियोजित ठिकाण होतं सुपे-पाटस रस्त्यावरील पुही घाटाच्या माथ्यावर असणारी यादवकालीन पाणपोई. प्राचीन आणि मध्ययुगीन काळी नगर शहराशी जोडणारा हमरस्ता म्हणून वापरात असणाऱ्या ह्या रस्त्यावरची आज शिल्लक असणारी एकमेव खूण म्हणजे ही पाणपोई (चित्र ११). संवर्धनाच्या प्रतीक्षेत उभी असणारी ही सुघड वास्तू आजही बऱ्यापैकी स्थितीत उभी आहे. आतमध्ये एकेकाळी तीन रांजण असावेत असं वाटतं. आज मात्र त्यातलं एकच नक्षीदार रांजण जागेवर आहे (चित्र १२).

चित्र ११: यादवकालीन पाणपोई - सुपे

चित्र १२: पाणपोईतील नक्षीदार रांजण

पुढचा टप्पा होता लोणी भापकर. त्याआधी सुपे गावात येऊन पोटभर न्याहारी केली. शरीराला दिवसभरासाठी पुरेसं इंधन मिळालं होतं. लोणी भापकर गावातल्या एका देवळाबाहेर ठेवलेले अनेक आणि त्यातले काही चारही बाजूनी कोरीवकाम असलेले वीरगळ सवंगड्यांना दाखवले आणि माझ्या अनेक आवडत्या मंदिरांपैकी एक, मल्लिकार्जुन मंदिरापाशी आलो. सर्वात पहिले मित्रांना दाखवली ती यज्ञवराहाची मूर्ती (चित्र १३). चाकणच्या चक्रेश्वरातल्या यज्ञवराह मूर्तीसारखीच इथेही एक रेखीव आणि बारीक कलाकुसर असणारी यज्ञवराह मूर्ती उपेक्षित पडून आहे. पुस्तकातलं सखोल वर्णन वाचत मूर्ती न्याहाळली.

चित्र १३: यज्ञवराह - लोणी भापकर

मल्लिकार्जुन मंदिरात प्रवेश केला. इथेही द्वारशाखा, सभामंडपातले जणू एखाद्या कातकाम यंत्रावर कोरून काढल्यासारखे वाटणारे खांब, छतावर कोरलेले दगडी झुंबर, कृष्णलीला आणि इतरही मूर्ती पाहताना पुस्तकाचा पूर्ण आधार घेतला (चित्र १४ व १५). मंदिरातलं एक एक कोरीवकाम पाहून सवंगड्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायला मजा वाटत होती.

चित्र १४: कातकाम केल्यासारखे वाटणारे खांब - मल्लिकार्जुन (चित्रकृपा: दुर्गेश वैकर)

चित्र १५: छतावरचं दगडात कोरलेलं झुंबर आणि कृष्णलीला (चित्रकृपा: दुर्गेश वैकर)

आता मंदिरासमोरच्या पुष्करणीत प्रवेश केला. विष्णूची दशावतार रूपे, प्रसूतिदशेतील स्त्री, कामशिल्पे आणि इतरही मूर्तींचं पुन्हा एकदा जमेल तेवढं सखोल निरीक्षण केलं. ह्यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे जवळपास दहा वर्षांनी पुष्करणीत इतकं पाणी साठलं होतं.

चित्र १६: पुष्करणी - लोणी भापकर

इथून पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी कोणीच उठायला तयार नव्हतं. तशी भुरळच घालणारी जागा आहे ही. पण पुढे जे काही बघायचं होतं तेही छानच आहे असं सांगून सगळ्यांना बाहेर काढलं.

कऱ्हा नदीच्या काठावर वसलेल्या पांडेश्वर (पांडवेश्वर) गावात आणि तेच नाव असणाऱ्या मंदिरात पोहचलो. ह्या मंदिराशी एक पौराणिक कथा जोडली गेलेली आहे ती अशी: (आंतरजालावरून साभार)
अज्ञातवासात असताना या ठिकाणी पांडवांचे काही काळ वास्तव्य होते. वास्तव्यादरम्यान त्यांना या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे जाणवले. त्यावेळी ब्रम्हदेव सासवडजवळील गराडे गावाजवळ जलपूर्ण कमंडलू घेऊन समाधिमग्न बसले होते. कृष्णाने भिमाला जाऊन तो कमंडलू कलंडून देण्यास सांगितला. त्यातून वाहणार्‍या जलधारेतून सरिता वाहेल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल असे कृष्णाने सुचविले. भिमाने समाधिमग्न असलेल्या ब्रम्हदेवाला जागे करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न असफल झाला. ब्रम्हदेवाला सावध करण्यासाठी भिमाने ब्रम्हदेवाच्या मस्तकावर शीतल जल ओतले, क्रोधित झालेले ब्रम्हदेव भिमाच्या मागे लागले. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे भिमाने वाटेत शिवलिंगे तयार केली. शिवलिंगाची पुजा केल्याशिवाय ब्रह्मदेवांना पुढे जाता येईना. ब्रम्हदेवांच्या कमंडलू म्हणजेच करामधून जन्मलेली नदी म्हणजे कऱ्हा. भिमाने ज्या ठिकाणी शिवलिंगे तयार केली, त्या ठिकाणी आज भव्य शिवालये आहेत. कोटेश्वर, सिध्देश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, पांडेश्वर  हीच ती मंदिरे आहेत असे मानले जाते. मूर्तिशास्त्रदृष्ट्याही हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे (चित्र १७). मंदिरासमोरची, आतून जिना असलेली दीपमाळही आवर्जून पाहावी अशीच आहे.
चित्र १७: द्वारपाल - पांडेश्वर (चित्रकृपा: दुर्गेश वैकर)

पुढचा टप्पा, म्हणजेच जेजुरीजवळील बल्लाळेश्वर. पेशव्यांनी बांधलेली ही एक अप्रतिम कलाकृतीच म्हणावी लागेल. बंधारा बांधून तयार केलेल्या ह्या तलावाला पेशवे तलाव ह्याच नावाने ओळखतात. बंधाऱ्याच्या पोटात सिंचनासाठी लागणारं पाणी साठवण्याची व्यवस्था केलीये आणि त्याच बरोबर चार सुघड असे जिने आणि एक महादेवाचं मंदिरही निर्माण केलं आहे, जे बल्लाळेश्वर ह्या नावाने संबोधलं जातं. मागच्या भेटीच्या वेळी कोरडा पडलेला हा तलाव ह्या वर्षी भरलेला पाहून छान वाटलं (चित्र १८).

चित्र १८: बल्लाळेश्वर (जुन्या भटकंतीवेळी घेतलेलं चित्र)

पुढचं ठिकाण जेजुरीजवळच असणारं लवथळेश्वर हे होतं. पण हमरस्त्याला लागूनच असलेलं हे ठिकाण आता रस्तारुंदीकरण आणि वृक्षतोडीमुळे आपली रयाच हरवून बसलं आहे. रामदासस्वामींचा ह्या मंदिरात मुक्काम झाल्याची आणि "लवथवती विक्राळा" ही आरती त्यांना ह्याच ठिकाणी स्फुरल्याची माहिती मिळते. दुर्गेशच्या मित्रांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला सुरवात केली.

पांडेश्वरच्या पौराणिक कथेमध्ये उल्लेख केलेली सासवडजवळची चांगवटेश्वर, संगमेश्वर ही मंदिरं अनेकवेळा पाहून झाली होती. बाकी होती ती सिद्धेश्वर आणि कोटेश्वर. ऐनवेळी ती पाहण्याचा निश्चय करून सासवडमध्ये आलो. बाजी पासलकर समाधीपुढे क्षणभर नतमस्तक होऊन आणि पुढे थोडासा पोटोबा करून वाट विचारत सिद्धेश्वर मंदिरापाशी आलो. छान झाडीभरल्या निर्जन ठिकाणी उभं असलेलं हे राऊळ पाहून प्रसन्न वाटलं आणि दिवसभराच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला (चित्र १९).
चित्र १९: सिद्धेश्वर - सासवड

पुढे गराडे गावाच्या दिशेने छोटासा प्रवास करून कोडीत गावाजवळील कोटेश्वर मंदिरालाही भेट दिली (चित्र २०). मंदिरापाशी अचानक गावातलेच एक काका भेटले आणि त्यांनी ह्याच गावात असणारा आचार्य अत्रे आणि मुंबईतलील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची इमारत बांधण्यात ज्यांचा सहभाग होता ते अभियंता रावसाहेब वैद्य ह्यांचाही वाडा मंदिरापासूनच दाखवला.

चित्र २०: कोटेश्वर - कोडीत - सासवड

एका दिवसात इतकं सारं पाहून झालं होतं. आता परतीच्या मार्गावरचं, हिवरे गावातलं आणि पुन्हा एकदा मला आवडणारं असं शंकेश्वराचं देऊळ दुर्गेशला दाखवून बोपदेवघाट मार्गे आम्ही पुण्याच्या शहरी गजबजाटात मिसळून गेलो.

आहे की नाही हे सारं कवी अनिलांच्या त्या कवितेतल्या ओढाळ वासराप्रमाणेच !!!

संदर्भ:

सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या - प्र के घाणेकर
डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
Trekshitiz.com
https://www.marathimati.net/shiva-temples-of-saswad/
http://saswad.in/?p=551

अत्यंत महत्त्वाचं असं काही:

माझ्या मराठी बांधवांनो... चला...
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
  • हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
  • अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
  • आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.

तळ टीप:

वाचकहो !!
  • मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून एक सर्वसामान्य हौशी भटक्या आहे. लिखाणातली माहिती ही लेखाखाली दिलेले संदर्भ आणि माझ्या प्रवासानुभवांच फलित आहे, तेव्हा जाणकारांनी, ह्या लिखाणात शक्य असणाऱ्या त्रुटी/चुकां बद्दल मला क्षमा करून, जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
  • मी कोणी सिद्धहस्त लेखकही नाही, तेव्हा माझ्या अल्पमतीला सुचलेलं माझं हे बाळबोध लिखाणही आपण मोठ्या मनानं गोड मानून घ्यावं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संपले बालपण माझे

सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

दोन दिवस सहा किल्ले

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!

खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...