सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

भंडारा लेणी, माणचं एकुटवाणं विहार लेणं आणि फिरंगाईचं गुहामंदिर

साधारणपणे लेणी म्हंटलं की बहुतांशी लोकांच्या डोळ्यासमोर येतात ती कार्ले, भाजे, अजिंठा, वेरूळ यांसारखी काही कलाकुसरयुक्त आणि बोटांवर मोजण्याइतकी लेणी. हवं तर हा लेख वाचण्याआधी, प्रयोग म्हणून करून पहा की, आपल्याला किती लेण्यांची नावं माहित आहेत? मी ही काही तुमच्याहून वेगळा नाही, काही वर्षांपूर्वी मलाही बोटांवर मोजण्याइतक्याच लेण्या ठाऊक होत्या. पण मागच्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या कृपेने, किल्ले आणि सह्याद्रीसारख्या आवडीच्या विषयांवर वाचन आणि श्रवण करता करता, "प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास" ह्याविषयीची उत्कंठा वाढत गेली आणि मग माझ्या बुद्धीला झेपेल तितक्या सखोलात शिरून माहिती मिळवण्याची सुरुवात झाली. त्यातलाच एक भाग, म्हणजेच "लेणी" ह्या विषयावर बरीचशी माहिती मिळत गेेली आणि लेण्यांबद्दलचे काही आकडेही समोर आले. तर, अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारतात साधारण १६०० कोरीव लेणी आहेत, त्यातली १२०० (म्हणजे ७५%) लेणी ही महाराष्ट्रात आहेत, त्यातलीही ९०० लेणी ही पुणे जिल्यात आहेत आणि त्यातलीही ७०० लेणी एकट्या जुन्नर तालुक्यात आहेत, आता बोला !!! पण अर्थातच ही सर्व लेणीकामं काही कार्ले, भाजेप्रमाणे कलाकुसरयुक्त नाहीत. तेव्हा मूळ लेखाला हात घालण्याआधी, लेणी म्हणजे काय? ती कोणी, कधी आणि का खोदून ठेवली ? ह्याबद्दल थोडी माहिती असणं गरजेचं आहे.

लेणी म्हणजे साधारणपणे मानवाने डोंगरांतील कातळ खोदून तयार केलेली गुहा. अशी एक सलग गुहा म्हणजे एक लेणं आणि एकाच डोंगरात, एका बाजूला एक खोदलेल्या लेण्यांचा गट म्हणजे "लेणीसमूह". ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात (आजपासून साधारण २२०० वर्षांपूर्वी) सम्राट अशोकाने लेणी किंवा शैल्यगृह खोदून, लेणी प्रथेचा पाया रोवला आणि ही परंपरा पुढे वेगवेगळ्या राजवटींच्या आश्रयाखाली इसवी सनाच्या आठव्या - नवव्या शतकापर्यंत (म्हणजे किमान १००० वर्ष) टिकून राहिलेली दिसते. हा काही थोडा थोडका काळ नाही, तेव्हा वरती दिलेले लेण्यांचे आकडे हे खोटे असणेही संभवत नाही. धर्मप्रसारासाठी देशभर संचार करणाऱ्या बौद्ध भिक्षुंसाठी, मूळ वस्तीपासून लांब, एकांत मिळेल अशी निवास व्यवस्था (विहार) तयार करणे, हा होता लेणी खोदण्याचा सुरुवातीचा उद्देश. कालांतराने, त्यातच भिक्षूंच्या प्रार्थनेसाठी स्तूप आणि नंतर मोठाले प्रार्थनाकक्ष (चैत्यगृह) कोरायला सुरुवात झाली. पुढे हिंदू आणि जैनांनीही लेणी खोदायला सुरुवात केली. काळानुसार त्यात मूर्तिकलाही विकसित होत गेली. इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत ह्या कलेने परमोच्च बिंदू गाठला होता, ज्याचं उदाहरणं म्हणून आपण, आठव्या शतकात राष्ट्रकूटांनी तयार केलेल्या वेरूळच्या कैलास लेण्याकडे पाहू शकतो.

महाराष्ट्रात लेणी खोदण्याची सुरुवात ही सुपरिचित, शककर्ते सातवाहन राजवटीच्या काळापासून (म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापासून) झालेली दिसते. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात लेणी आढळण्यामागची काही प्रमुख कारणं आहेत ती अशी:

  • लेणी खोदण्यासाठी योग्य गुणवत्तेचा, एकसंध आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असणारा, सह्याद्रीरूपातला खडक किंवा कातळ.
  • सागरी बंदरं आणि देशावरच्या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारे, सह्याद्रीतल्या घाटवाटांमधून जाणारे, प्राचीन काळापासून (किमान २२०० वर्षांपूर्वीपासून) अस्तित्वात असलेले व्यापारी मार्ग आणि भरभराटीस आलेला भारत आणि रोम देशात चालणारा व्यापार.
  • आणि ह्या व्यापाराच्या जोरावर, आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्थैर्य लाभलेल्या सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट ह्यांसारख्या राजसत्तांचा राजाश्रय, त्यांनी लेणी खोदण्यासाठी दिलेली दानं (जे आजही शिलालेख स्वरूपात आढळतात) आणि त्याच बरोबर व्यापारी आणि काही प्रमाणात सामान्य शेतकरीवर्गाकडून मिळत गेलेलं सहाय्य आणि प्रोत्साहन.
त्याकाळच्या सुजलाम् सुफलाम् अशा ह्या आपल्या महाराष्ट्रभूमीतून धर्मगुरू, साधक, व्यापारी, प्रवासी असे कितीतरी लोक संचार करत असत. सह्याद्रीच्या निबिड अरण्यातून, दऱ्याखोऱ्यातून कष्टदायक संचार करताना, विश्रांतीसाठीची, पिण्याच्या पाण्यासाठीची, निवासासाठीची, साधकांची प्रार्थनास्थळं म्हणून, समाजकेंद्र म्हणून, शिक्षणकेंद्र म्हणून, अशा एक ना कितीतरी गरजांमधून लेण्यांची निर्मिती ही हजार एक वर्ष अखंड सुरू राहीली असं अभ्यासक मानतात.

कालांतराने जेव्हा, लेण्यांच्या तुलनेत वेळ, पैसा आणि कष्ट वाचवणारी मंदिरप्रथा उदयास आली (साधारण इसवीसनाच्या चौथ्या शतकात उस्मानाबादजवळ तेर ह्या ठिकाणी बांधलेलं मंदिर हे सर्वात जुुुुनं मानतात) आणि पुढे आठव्या शतकापर्यंत विकसित होत गेली, तेव्हा लेणीकला किंवा प्रथा हळूहळू मागे पडत गेली. पण तरी त्यामुळे ह्या लेण्यांचं अनन्यसाधारण महत्त्व काही उणावत नाही. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि शासनाने दुर्लक्ष केलेल्या कितीतरी गावांना आजही उन्हाळ्यात पाणी मिळतं ते फक्त ह्या २००० वर्षांपूर्वीच्या लेण्यांच्या कृपेने (मुळशी खोऱ्यातल्या कैलासगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका धनगराकडूून मिळालेली ही माहिती). अश्या ह्या लेण्यांची स्थानं जर आपण नकाशावर जोडत गेलो तर प्राचीन काळच्या व्यापारी किंवा प्रवास मार्गांचं एक जाळंच आपल्यासमोर आकाराला येतं.

सह्याद्री रांगांमध्ये (विशेष करून नाशिक आणि पुणे ह्या जिल्ह्यांच्या मधल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात) आपल्याला विविध स्वरूपातली खोदकामं केलेली आढळतात. काही ठिकाणी मोठाले कलाकुसरयुक्त चैत्य आणि विहार खोदलेली बौद्ध लेणी, काही ठिकाणी फक्त छोटे स्तूप आणि मोजके विहार असणारी बौद्ध लेणी; काही ठिकाणी हिंदू लेणी, काही ठिकाणी जैन लेणी, काही ठिकाणी नुसतेच विहार आणि पाण्याची काही टाकी/कुंड, काही ठिकाणी मूळ बौद्ध लेण्यांचं स्थानिकांनी हिंदू देवता बसवून केलेलं रूपांतर, काही ठिकाणी कमी प्रतीचा किंवा पाणी झिरपणारा कातळ लागल्याने अर्धवट सोडून दिलेली लेणी, काही ठिकाणी आज पोहचताही येणार नाही अशी दुर्गम लेणी, काही ठिकाणी नुसतीच पाण्याची टाकी किंवा कुंड असं काही ना काही खोदलेलं दिसतं. माझं हे लिखाण म्हणजे, आपल्यापासून थोड्याच अंतरावर असूनही, आज अल्पपरिचित असणाऱ्या अशा काही लेण्या तुम्हाला माझ्या नजरेतून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न.

भंडारा डोंगर आणि लेणी (२२ नोव्हेंबर २०२०)

साधारण पस्तीस एक वर्षांपूर्वी तळेगावाजवळच्या घोरावाडीमध्ये एक सुखी त्रिकोणी कुटुंब, आपल्या छोट्याश्या एका खोलीच्या घरट्यात नांदत होतं. घरातल्या कर्त्या तरुणाला डोंगर किल्ले भटकायची आणि सायकलवर दूर दूर फिरायची भारी हौस. त्याकाळच्या त्या साध्या सायकलवर त्या तरुणानं अगदी गोव्यापर्यंतही मजल मारली होती. असाच एक दिवस, तो कष्टकरी तरुण बाप आपल्या जेमतेम ३-४ वर्षे वयाच्या लेकराला सायकलवर पुढ्यात बसवून भंडारा डोंगर दाखवायला घेऊन गेला. त्या लेकराच्या आयुष्यातली बहुदा ती पहिलीच डोंगरयात्रा असावी, किमान त्याला धूसर का होईना, पण आजही आठवणारी अशी तरी नक्कीच पहिली डोंगरयात्रा म्हणता येईल. तेव्हा त्या मुलाला कल्पनाही नसेल की पुढे जाऊन हेच डोंगर त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनणार आहेत, त्याला प्रचंड माया लावणार आहेत. आज पस्तीस वर्षांनंतर तेच लेकरू अगदी डोंगरमय होऊन गेलंय आणि आजच्या दिवशी जणू, त्याचं एक जीवनचक्रच पूर्ण होणार आहे. आज तो, त्याच्या वडिलांनी सायकलवर नेऊन दाखवलेला भंडारा डोंगर, पुन्हा एकदा सायकलवरच जाऊन पाहणार आहे. पस्तीस वर्षांपूर्वीची ती बाप-लेकराची जोडी कोण? ते एव्हाना तुम्हाला कळलंच असेल. ह्यावेळच्या भटकंतीला मात्र थोडी अभ्यासाचीही जोड असणार आहे.

गेले काही दिवस, तुकोबारायांच्या गाथेचं नित्य वाचन सुरु आहे आणि त्यात तुकोबा त्यांची एक व्यथा बऱ्याचदा मांडताना दिसतात.

विरोधाचें मज न साहे वदन । बहू होतें मन कासावीस ।
म्हणऊनि जीवा न साहे संगती । बैसता एकांती गोड वाटे ।।  

अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ ।
आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ।।

विठ्ठलभक्तीमध्ये लीन राहण्यासाठी अत्यंत गरजेचा असा एकांत, दैनंदिन संसारात मिळत नसल्याची ही खंत. पुढे ह्याच एकांताच्या शोधात असताना, तुकोबांच्या मदतीला उभे ठाकले ते भंडारा आणि भामचंद्र/भामगिरी डोंगर. तुकोबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या देहूगावापासून साधारणपणे उत्तरेला अगदीच थोड्या अंतरावर हे दोन्ही डोंगर उभे आहेत. भामचंद्र डोंगर आहे भामनेर हद्दीत, तर भंडारा डोंगर येतो आंदर मावळाच्या हद्दीत आणि दोन्ही डोंगरांना विभागतं ते लहानगं सुधा नदीचं खोरं. ह्या दोन्ही डोंगरांमध्ये असणाऱ्या प्राचीन लेण्या म्हणजेच तुकोबांना ध्यान-धारणेसाठी निवडलेला एकांतवास. तपश्चर्या स्थानांचं तुकोबांनी जे वर्णन लिहून ठेवलंय, ते भंडारा आणि भामचंद्र ह्या दोन्ही डोंगरातल्या लेण्यांशी फारच मिळतं जुळतं वाटतं (अर्थातच तुकोबांच्या काळाला अनुसरून).

बहुत करोति निशब्द । दाट न रिगे श्वापद ।
शुक अन षटपद । तेऊते नाही ।।
आणिकही एक पहावे । जे साधकही वसते होआवे ।
आणि जनाचेनी पायरवे । मळेचिना ।।

भामचन्द्र लेणी दोनदा पाहून झाली होती, तेव्हा आज भंडारा लेणी पाहायचं ठरवून पहाटे ६ ला रानभुलीसवे प्रयाण केलं. तळवडे मार्गे देहूत पोहचून, देऊळवाड्याला सायकलवरूनच नमस्कार घालून, पुढे ७ वाजता भंडारा डोंगराचा पायथा गाठला. रानभुलीचं थोडं आजारपण चालू असल्याने, पुढचा अडीच किमी घाट मात्र ढकलगाडी खेळतच चढू लागलो. अर्धा घाट चढून झाला असेल तेवढ्यात तो तेजनिधी लोहगोल धुक्याची दुलई बाजूला सारून जागा झाला आणि रानभुलीच्या चित्राचे नित्य सोपस्कार पार पडले (चित्र १).

चित्र १: भंडारा डोंगराच्या वाटेवरून टिपलेला सूर्योदय

उर्वरित चढाई चढून डोंगराचा माथा गाठला. पस्तीस वर्षांपूर्वीचं अस्पष्टसं आठवणारं ते ठिकाण साहजिकच पूर्णपणे बदलून गेलं होतं. वरती एका भव्य अशा मंदिराच्या नवनिर्माणाचं काम सुरु होतं (चित्र २).

चित्र २: तुकोबांच्या वैकुंठगमन स्मृतिमंदिराचं होऊ घातलेलं काम

थंड हवेत हवीहवीशी वाटणारी, त्या कोवळ्या उन्हाची किरणं अंगावर घेत चहुबाजूंचा भवताल न्याहाळला. घोरवडेश्वर, भामचंद्र, फिरंगाई असे कितीतरी डोंगरमित्र आणि इंद्रायणी, सुधा ह्या नद्यांना रामराम-शामशाम करून झालं. लेणी पाहायच्या ओढीने माथ्यावरच असणाऱ्या एका उपहारगृहाजवळ रानभुलीला उभं करून मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि डोंगरसोंडेच्या किंचित पश्चिम अंगाने उतरणारी पायवाट धुंडाळत लेण्यांकडे चालता झालो. पुढच्या दहाच मिनिटांत त्या बौद्ध लेण्यापाशी पोहचलो. डावीकडे कातळात कोरलेली लेणी आणि उजवीकडे झाडांची गर्द हिरवाई, असा तो देखावा पाहून मनोमन सुखावलो. तुकोबांचा हेवा वाटू लागला. लेण्यांच्या सुरुवातीलाच एक विहार खोदलेला दिसतो. विहारापाशी जाण्यासाठी खोदीव पायऱ्या, ऐसपैस ओसरी, विहाराच्या दाराशीच कोरलेला दगडी बाक आणि आत विहार असं ह्याचं स्वरूप. सध्या ह्या विहाराचा उपयोग वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि ध्यानमंदिर म्हणून होताना दिसतो (चित्र ३).

चित्र ३: निवास आणि ध्यानमंदिर म्हणून वापरात असलेला विहार

ह्या विहारापासून थोडंच पुढे, किंचित अवघड चढाई असणाऱ्या उंचीवर एक हीनयान बौद्धपंथियांच्या प्रार्थनेसाठी कोरलेला स्तूप दिसतो (चित्र ४).

चित्र ४: स्तूपाशेजारून समोरची गर्द हिरवाई टिपण्याचा प्रयत्न

स्तूपाच्या पुढे असणारा आणखीन एक छोटा विहार पाहून झाला की आपलं लेणी दर्शन पूर्ण होतं. इथली निरव शांतता आणि निसर्गसंपन्न वातावरण, घरदार सोडून इथेच राहण्याच्या मोहात पाडायचा प्रयत्न करतं, पण अजून तरी हा पर्याय आपल्यासाठी नाही, अशी स्वतःची समजूत घालून पुन्हा आल्या वाटेने पंधरा मिनिटांची चढाई चढून रानभुलीला उभं केलेल्या उपहारगृहापाशी आलो. उपहारगृहातल्या छोट्या दादाने मनापासून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेतला आणि परतीचा प्रवास सुरु केला. डोंगर उतार उतरून पुन्हा तळेगाव - चाकण मार्गावर आलो आणि देहूकडे न जाता, तळेगाव दिशेला निघालो. आधी पाहून झालेल्या इंदुरीच्या गढीचं बाहेरूनच अवलोकन करून इंद्रायणी नदी ओलांडली आणि तिथून किलोमीटरभरच पुढे आल्यावर, तळेगाव रस्ता सोडून डाव्या बाजूच्या सैन्य आगाराचा रम्य आणि शांत अशा रस्त्याने घोरवाडी मार्गे बेगडेवाडी गाठलं. इथे थोडी उदरशांती करून मुंबई - पुणे महामार्गावरचं शेलारवाडी जवळ केलं आणि घरचा रस्ता धरला.

रिहे धरण आणि माणचा विहार (१६ जानेवारी २०२१)

२०१०-११ चं वर्ष, किर्लोस्करांच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने कोळवण खोऱ्यात चकरा होत होत्या. चिंचवडातून जाणार असेन, तर हिंजवडी - माण मार्गे जाणं व्हायचं. माण गावाच्या थोडं अलीकडूनच डाव्या बाजूच्या एका डोंगरात एका गुहा लक्ष वेधून घ्यायची, पण तिथे जाऊन पाहावं, काय आहे ते जाणून घ्यावं, असं तेव्हा कधी वाटलं नाही. पुढे आठ वर्ष पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात आणि त्यातुन वेळ काढत जमेल तसं दुर्गभ्रमंती करण्यात निघून गेली. त्यातच २०१७-१८ ला नोकरीतही एक बदल झाला, त्यातल्या त्यात आवडीच्या कामाची नोकरी पत्करली. धावपळ सुरूच होती पण तरीही लेखाच्या सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे, आवडीच्या विषयांवरचा अभ्यास वाढवला आणि २०१९ च्या जून महिन्यातल्या एके दिवशी एक छान संकेतस्थळ सापडलं.

ह्या संकेतस्थळाचा चालक-मालक असणाऱ्या तरुणाचं नाव वाचलं आणि एकदम २००० साली केलेली राजगडवारी आठवली. त्यावेळी होणाऱ्या दुर्गवारींचं नियोजन हे कोणाच्या तरी घरी भेटून केलं जायचं, कारण अर्थातच तेव्हा दूरध्वनी हे दुर्लभ होते. तर त्या राजगडभ्रमंतीचं नियोजन करायला आम्ही, माझा जवळपास ३५ वर्षांपासूनचा सखा, अजयच्या घरी भेटलो होतो. अजय किंवा चिराग (हा ही आमच्याच भ्रमणमंडळातला एक), नक्की कोण ते आता आठवत नाही, पण कोणीतरी, राजगडाचा हाताने काढलेला एक नकाशा माझ्या हातात ठेवला. नकाशा काढणारा, त्या दोघांपैकी कोणाचा तरी परिचित होता. त्या पठ्ठयाने नियोजनात मदत व्हावी म्हणून स्वतःहून हा नकाशा काढून पाठवून दिला होता. नकाशा तर उत्तमच होता आणि नकाशाखाली त्या बहाद्दरानं सुवाच्य अक्षरात त्याचं नावही लिहिलेलं होतं, "साईप्रकाश बेलसरे". तर ह्याच साईप्रकाशचं संकेतस्थळ मला सापडलं आणि हा एक ठार सह्याद्रीवेडा आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. सह्याद्रीत उभं आडवं भटकणं हे आजपर्यंत फक्त गोनीदा, आनंद पाळंदे, प्र के घाणेकर अशा गुरुव्यक्तिंनाच काय ते जमलं, अशी समजूत होती पण माझ्याच वयाचा साईप्रकाशलाही इतकं फिरलेलं आणि उत्तम लिहूनही ठेवलेलं पाहून फारच हेवा वाटला. पण त्या हेव्यापेक्षा जास्त साईचं सह्याद्रीतलं काम पाहून अभिमान वाटला आणि उशिरा का होईना आपल्याकडूनही हे यथाशक्ती घडावं अशी प्रेरणा मिळाली. प्रत्यक्षात कधीही भेट न झालेल्या साईच्या कार्याला सलाम आणि प्रेरणा देण्यासाठी मनोमन आभार !!!

तर साईप्रकाशचं संकेतस्थळ पाहता पाहता, त्यात अचानक मला त्या माण जवळच्या डोंगरात आठ वर्षांपूर्वी पाहिलेल्या गुहेचं गुपित उलगडलं. ती एक नुसती नैसर्गिक गुहा नसून, मानवनिर्मित विहार आहे असं लक्षात आलं. आता हे कळालंय तर लगेच वेळ काढून जाऊन पाहावं ना? पण योग काही आला नाही. कैलासगड भेटीच्या वेळी, एखाद्या दिवशी सायकलवर जाऊन, असं कितीतरी वेळा हा विहार पाहायचं नियोजलं होतं, पण काही ना काही कारणाने हे लेणं हुलकावणीच देत राहिलं.

१५ तारखेला, दर आठवड्याप्रमाणे अजयचा एक प्रश्न भ्रमणध्वनीसंचात येऊन पडला.

अज्या (अजय म्हणायची सवय नाही): उद्याचं काही नियोजन आहे का सायकलिंगचं?
(ह्यावेळी मात्र निश्चयच केला आणि अज्याला उत्तर धाडलं.)
पश्या (म्हणजे मीच): माणचं लेणं पाहून येऊ !!
अज्या: अंतर किती होईल? 
पश्या: २६ किमी !!
अज्या: फारच कमी आहे !! ५०+ व्हायला पाहिजे.
(आता लेण्याला "लांब जा" असं म्हणता येणार नव्हतं... म्हंटलं असतं तरी ते काय हलणार होतं तिथून?)
पश्या: मग पुढे रिहे धरणापर्यंत जाऊन येऊ.
अज्या: बरं, किती किमी होतंय मग?
पश्या (आमच्या खास बोलीत): पण्णास !!
अज्या: चालतंय !!

मग अजयच्या सांसारिक कर्त्यव्यांचं भान ठेऊन, पहाटे ५.३० ला प्रस्थान करायचं ठरलं. रात्री एकदम लक्षात आलं की, आधी लेण्याला गेलो तर अंधारातच लेणं शोधात बसायला लागेल, तेव्हा आधी "धरणाचं सौंदर्यलेणं पाहून मग लेण्यात धरणं धरून बसू" (उगाच आपला एक विनोदाचा प्रयत्न !!) असं ठरलं.

पहाटे आपापल्या रानभुल्या घेऊन (आत्ता अज्याच्या सायकलचं बारसं करायला वेळ नाही) निघालो आणि हिंजवडी - माण मार्गे, १-२ दमछाक करणारे चढ चढून, एकूण २१ किमी सायकलवून रिहे धरणापाशी पोहचलो, तोपर्यंत उजाडलं होतं. तांबूस - केशरी प्रकाशछटांनी पूर्वा उजळून निघाली होती. अजून न उगवलेले सूर्यनारायण चित्रचौकटीत येतील, असा अंदाज घेऊन अज्याने आधी दोन्ही रानभुल्या... मग रानभुल्यांच्या बाजूला आम्ही... अशा काही रचना करून अर्ध्या डझन प्रकाशचित्रांचा पाऊस पाडला. इतकं करूनही सूर्यनारायणांनी गंडवलंच, हे महाशय भलतीकडूनच उगवले. मग पुन्हा एकदा परिपूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) अज्याची एकच लगबग सुरु झाली (चित्र ५) आणि एकदाचं हवं तसं चित्र पदरात पडलं (चित्र ६).

चित्र ५: परिपूर्णतावादापायी मांडलेली आगळीवेगळी चूल

चित्र ६: आणि त्या चुलीतून जन्माला आलेला अविष्कार (चित्रकृपा: अजय)

हे असे सगळे चित्रसोपस्कार पार पाडून पुन्हा माणचा रस्ता धरला. पुन्हा एकदा तो खिंडीचा चढ चढून आणि पुढच्या उतारावरून सुसाट उतरत माण जवळ केलं. गावात शिरायच्या आधीच एक रस्ता उजवीकडे चांदे गावाकडे जातो, त्या रस्त्याला वळलो. १००-१५० मीटर्स अंतरावरच असणाऱ्या एका घरापाशी रानभुल्यांना उभं केलं, तोच घरातली काही पोरं आणि एक म्हातारबा कुतूहलाने जवळ आले आणि आम्हाला हिंदीभाषिक समजून, "किधरको जाने का है? कहासे आये है?" अशी हिंदीतच विचारणा केली. आम्ही आपलं आम्ही मराठीच आहोत असं सांगून, मराठीतूनच उत्तर दिलं, "वरच्या डोंगरातल्या गुहेत जायचंय." तरी आजोबांचं हिंदी काही संपेना, "जाओ जाओ, भगवान का मंदिर है उपर, सायकल छोडो इधरच". आम्ही "बरं" म्हणून एकदा वाट विचारून लेण्यांकडे निघालो. लेण्याला पोहचायला मळलेली अशी वाट नाहीच. तेव्हा झाडोऱ्यातून वाट काढत, दहा एक मिनिटांतच लेण्यापाशी आलो (चित्र ७).

चित्र ७: कधीकाळापासून इथेच स्थानबद्ध असलेलं एकुटवाणं विहार लेणं

जेमतेम पुरुषभर उंची आणि हातभार रुंदीच्या प्रवेशद्वाराच्या, उंबरठ्यापाशी असणाऱ्या दोन पायऱ्या उतरून आत प्रवेशलो. साधारण आठ फूट लांबी-रुंदी-उंची असणारी ही एक खोलीच होती. इतर लेण्यांमधील विहाराप्रमाणे दगडात कोरलेले बाक मात्र इथे काही आढळले नाहीत. विशेष म्हणजे आजूबाजूला पाण्याची खोदीव टाकीही इथे आढळत नाहीत. जमिनीवर मात्र एका बाजूला सारीपाट कोरला आहे. हा ही पूर्वीचाच, की नंतर कोणी कोरला हे सांगता येणार नाही. धर्मचिन्ह, शिलालेख असं काहीही नसल्याने हा विहार कधी आणि कोणी कोरला, ह्यावरही काही माहिती सध्या तरी उपलब्ध दिसत नाही. हिंजवडीतल्या, संख्येने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इमारतींच्या विळख्यात सापडलेलं असं हे माणचं एकुटवाणं विहार लेणं (चित्र ८).

चित्र ८: पुरुषभर उंचीचं प्रवेशद्वार आणि उजवीकडे मागे हिंजवडीतल्या इमारतींचा विळखा

पाच-दहा मिनिटांतच डोंगर उतरून, माण गावातच चहा प्यायलो आणि उरलेलं अंतर कापत घरी परतलो.

लेण्यात वसलेलं फिरंगाई देवीचं गुहामंदिर (१३ फेब्रुवारी २०२१)

ह्या सायकलयात्रेचं नियोजन, नाही म्हंटलं तरी जरा महत्त्वाकांक्षीच होतं असं म्हणावं लागेल. एकूण अंतर ६० किमी भरणार होतं आणि त्यातच एक दीडशे मीटर्स उठावाचा डोंगरही चढून जायचा होता. पहाटे ५.२० ला निघालो. जुन्या मुंबई महामार्गावरून मजल-दरमजल करत रानभुली पळू लागली. देहूरोड, सोमाटणे मागे सोडून तळेगाव-चाकण फाट्याला पोहचलो तरी अंधारच होता. इथे मी एक गडबड केली. तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म. औ. वि. म.) रस्त्याकडे वळायला सोपं जावं आणि अंतरही थोडंच होतं म्हणून सायकल रस्त्याच्या विरुद्ध दिशेने न्यायला सुरुवात केली आणि जे काही जिवावरचे प्रसंग अनुभवले आहेत ते आठवलं की, अंगाचा थरकाप होतो. एक तर अंधार, रस्ता दिसायला मार्ग नाही, त्यात समोरून तुफान वेगात भुभुकार करत अंगावर येणारी मालवाहू अवजड वाहनं आणि त्यांचे थेट डोळ्यात शिरणारे दिव्यांचे प्रकाश झोत !! पुन्हा अशी चूक होणे नाही !! कसंबसं ते २०० मीटर्सचं अंतर पार केलं आणि म. औ. वि. म. रस्त्याकडे वळलो, तेव्हा कुठे हायसं वाटलं. पुढचा रस्ता बऱ्यापैकी रिकामा असला तरी प्रचंड चढ-उतारांचा, उरलेलं ९ किमी अंतर संपतच नाहीये असं वाटत होतं. उजवीकडे फिरंगाईच्या डोंगराच्या पायथ्यापासून ते थेट गुहामंदिरापर्यंत, नागमोडी रांग लावून उभे असलेले पथदिवे जणू माझ्या स्वागताची वाट पाहत ताटकळले होते. एका क्षणाला मात्र उजवीकडे वळायची मोठ्ठी खूण समोर आली, जे सी बी कारखाना. चौकातून उजवीकडे वळालो आणि अर्ध्या पाऊण किमीवर डावीकडे एक कमान आणि त्यातून कच्चा रस्ता डोंगराकडे जाताना दिसला. कमानीतून प्रवेश केला आणि शक्य असेपर्यंत पाय मारत स्वतःला सायकलवू लागलो. दोन-पाचच मिनिटांत पायउतार होण्याची वेळ आली. एका ठिकाणी रानभुलीला एका झाडाच्या आधाराने उभं केलं आणि आता चढाईला सुरवातच करायची तेवढ्यात काय खुळ डोक्यात शिरलं, काय माहीत? पुन्हा रानभुलीला झाडापासून सोडवलं आणि ढकलगाडी करत डोंगर चढू लागलो. १५० मीटर्स ची चढाई होती, कच्चा रस्ता असला तरी प्रचंड चढाचा होता. काही क्षणातच उर धपापू लागलं, श्वासाचा वेग त्याच्या कमाल मर्यादेला जाऊन भिडला, हृदयाचे ठोके जणू कानाजवळच ढोल वाजवू लागले, पण काय ऊर्जा भिनली होती अंगात कोण जाणे, न थांबता तो डोंगर चढतच राहिलो. कदाचित, वर लेण्यात बसलेल्या त्या फिरंगाईनेच शक्ती दिली असावी. अर्ध्या तासात त्या शक्तीस्थानापाशी पोहचलो आणि क्षणभर थांबून एक चित्र घेऊन टाकलं (चित्र ९).

चित्र ९: फिंरंगाई आणि रानभुली अशी दोन शक्तिरूपं

पुन्हा उरलेलं थोडकं अंतर चढून नव्याने बांधलेल्या जिन्यापाशी आलो. अख्ख्या मावळरहाटाचं श्रद्धास्थान असणारी ही फिरंगाई देवी म्हणजे एक जागृत देवस्थान आहे, अशी मावळजनांची भावना आहे. हा नव्याने बांधलेला जिना म्हणजे ह्याच श्रद्धेपोटी होऊ घातलेल्या कायापालटाची नांदी आहे. काही वर्षांनी ह्या ठिकाणालाही चतुःश्रृंगीसारखं रुप प्राप्त होईल ह्यात शंका नाही. पूर्वी वहिवाटीत असणारी कातळातून कोरून काढलेली पायऱ्यांची वाट मात्र, ह्या नव्या बांधकामाखाली दडून गेलीये (चित्र १०).

चित्र १०: रया हरवून बसलेली कातळातली मूळ वाट

नव्या जिनेमार्गाचे चार टप्पे चढून लेण्यापुढे येऊन उभा राहिलो आणि फिरंगाई देवीच्या गुहामंदीरात रूपांतरित अशा त्या विहारात प्रवेश केला. समोरच एका दगडी चौथऱ्यावर चांदीचा पत्रा लावलेल्या एका मखरात फिरंगाई देवी विराजमान आहे, एक शेंदूर माखलेल्या तांदळा स्वरूपात आणि दुसरी काळ्या पाषाणातली रेखीव मूर्ती. जणू अवघ्या आंदर आणि नाणेमावळावर ती लक्ष ठेवून आहे (चित्र ११). बाजूलाच एक जोडविहारही आहे.

चित्र ११: प्राचीन विहारात विराजमान झालेली फिरंगाई देवी आणि उजवीकडे एक जोड-विहार

देवीला मनोभावे नमस्कार करून बाहेर आलो, जिना उतरलो आणि लेण्याकडे तोंड केल्यास, डाव्या बाजूला असलेल्या झाडाझुडपातून वाट काढत चालू लागलो. थोडंच पुढे गेल्यावर दिसला अजून एक विहार. विहारात समोरच्या भिंतीवरच एक हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते. पुढे, पोहचता न येण्याजोग्या ३-४ पुरुष उंचीवर, खोदकामाचे अजूनही काही प्रयत्न केलेले दिसतात. पुन्हा फिरंगाई लेण्यापाशी येऊन आता उजवीकडच्या बाजूच्या पायवाटेवर चालू लागलो. वाटेत काही पाण्याची टाकी खोदलेली आढळली, ती पाहून तसाच पूर्वेकडे चालत राहिलो आणि एका ठिकाणाहून समोर आकाशात सूर्यराव, खाली भंडारा डोंगर आणि त्याबाजूला सुधा नदीवरचं जाधववाडी धरण असं मोठं विहंगम दृश्य समोर आलं. तो देखावा डोळ्यात साठवून पुन्हा मागे फिरलो. वाटेतून नाणोली गावाच्या हद्दीतला तळेगाव म. औ. वि. म. चा परिसर चित्रात टिपला (चित्र १२).

चित्र १२: तळेगाव म. औ. वि. म. परिसर

ह्या चित्रातच आपल्याला पायथ्याचा जे सी बी कारखाना दिसतोय, त्याखाली डाव्या कोपऱ्यात अगदी बारीकशी फिरंगाई डोंगराकडे येणाऱ्या रस्त्यावरची कमान दिसते. समोर जो एकाकी डोंगर दिसतोय, तो आहे मंगरूळचा पिराचा डोंगर. तिथेही एक खांबटाकं आहे.

फिरंगाईचं मूळ स्थान हे दौंडजवळच्या कुरकुंभ इथे आहे. कुणीतरी, ह्या लेण्यात, कधी काळी देवीचा तांदळा बसवला आणि तेव्हापासून ती इथे वसलीये. अगदी इंग्रजांनी तयार केलेल्या स्थलवर्णनकोशातही (गॅझेटीयर) हीचा उल्लेख 'फिरंगाबाई' म्हणून आलेला दिसतो. आंदर मावळाच्या (आंद्रा नदीचं खोरं) पूर्व सीमेशी उभ्या असणाऱ्या डोंगरात हे लेणं खोदलेलं आहे. पण ह्या मावळातलं हे काही एकमेव लेणं नाही. तर कांब्रे, कल्हाट, पद्मावती (निगडे) आणि ह्याच लेखात समाविष्ट असणारं भंडारा, अशी अनेक लेणी आपल्याला ह्या खोऱ्यात खोदलेली दिसून येतात. आता ही सगळी लेणी कोणी, कधी आणि का खोदली? असे प्रश्न साहजिकच आपल्याला पडतात. एक भंडारा लेण्यातला स्तूप सोडल्यास, बाकी लेण्यांमध्ये कुठलीही धर्मचिन्ह किंवा शिलालेख इत्यादी सापडत नाहीत. त्यामुळे लेणी कोणी आणि कधी खोदली ह्याचा फार काही उलगडा होत नाही, पण अभ्यासकांच्या मते हे काम बौद्ध धर्मियांचं आणि किमान हजार वर्षांपूर्वीचं तरी असावं. ही लेणी इथे असण्याचा अजून एक कयास मात्र आपण नक्की बांधू शकतो, तो म्हणजे, लेखाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे प्राचीन बंदरं, घाटवाटा आणि देशावरच्या बाजारपेठा ह्यांना जोडणाऱ्या घाटवाटांवर व्यापारी, प्रवासी, धर्मगुरू, साधक अशा अनेकांच्या संचारादरम्यान विश्राम किंवा निवास व्यवस्थेसाठी ह्या लेण्यांचा उपयोग नक्कीच झाला असावा. हे समजावण्यासाठी, मी मुद्दाम एक नकाशाच करून ठेवला आहे (चित्र १३).

चित्र १३: आंदर मावळ परिसरातल्या घाटवाटा आणि लेण्या

हेच ते माझं नियोजनबद्ध "महाराष्ट्राटन" ह्या विषयावरचं काम. ताळेबंदीच्या काळात मी महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले, लेण्या, देवळं, ऐतिहासिक स्मारकं इत्यादी ठिकाणं नकाशावर नोंदवून ठेवली आहेत. बघुयात ह्या जन्मात किती पाहून होतंय ते? तर, नकाशातली लाल चौकट म्हणजे आहे फिरंगाई लेणी. त्याच्या उजवीकडे हिरवट रंगात जो काही परिसर मी दाखवला आहे, ते आहे आंदर मावळ (म्हणजेच आंद्रा नदीचं खोरं). खोऱ्याच्या पश्चिमेला जे ४ काळे बाण दाखवलेत, त्या आहेत फेणादेवी, घोडेपडी, भिवपुरी, कुसूर अशा काही सह्याद्रीतल्या घाटवाटा (फक्त पायीच जाता येईल अशा). प्राचीन काळात शूर्पारक (नालासोपारा) बंदरात उतरणारा माल कलियान (कल्याण) मार्गे पुढे ह्या आणि अशाच कितीतरी घाटवाटांमधून देशावर आणून पुढे चक्रपुुरी (चाकण), जुर्णनगर (जुन्नर), प्रतिष्ठाण (पैठण), भोगवर्धन (भोकरदन), तगरपूर (तेर), वत्सगुुल्म (वाशिम) अशा काही बाजारपेठांमध्ये नेला जायचा (किंवा भारतातून बाहेेर देशात नेला जायचा). त्यातल्या त्यात कुसूर घाट हा कल्याण आणि चाकण/पुणे ह्यांना जोडणारा सगळ्यात कमी अंतराचा आणि सोप्या चढणीचा घाट म्हणून वापरात असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. ह्या आणि अशाच इतर घाटवाटांवरती निवासाची ठिकाणं आणि नंतर संरक्षणार्थ बांधण्यात आलेले किल्ले (आंदर मावळात मात्र किल्ले नाहीत) आपल्याला दिसतात. तर आहे की नाही ह्या लेण्यांंना अनन्यसाधारण महत्त्व? फारच उत्कंठावर्धक आणि रोचक वाटतो मला आपल्या महाराष्ट्रभूमीचा हा इतिहास !!

पुन्हा एकदा फिरंगाई देवीला दंडवत घालून, रानभुलीसवे डोंगर उतरलो आणि तडक वडगावात येऊन दाखल झालो. पोटात एव्हाना हलकल्लोळ उठला होता. वडगावातली प्रसिद्ध वहिले मिसळ, चहा वगैरे रिचवलं. माझा तो सायकलावतार पाहून, वहिले दादांनीही न राहवून उत्सुकता आणि आपुलकीपोटी चौकशी केली... "कुडुन जाऊन आला म्हनायचा सायकल दौरा? आन् गाव कोनचं?" माझीही भाषा अशा वेळी आपसुकच बदलते आणि मी माझ्याही नकळत बोलून जातो... "फिरंगाईच्या दर्शेनाला ग्येलतो, चिंचवडला राहतो". आणि मग संभाषणाच्या शेवटी "चला यिऊ का मंग?" असा निरोप समारंभ पार पडला आणि पुन्हा एकदा महामार्गावरचा तो जिकीरीचा प्रवास करत घर गाठलं.

तर गड्यांनो !! आवडल्या का ह्या अल्पपरिचित लेण्या आणि त्यांमागचा इतिहास आणि भूगोल? पुढच्या लिखाणातही मी अजून काही लेण्या घेऊन तुमच्या भेटीला येईन, तोपर्यंत रामराम !!

संदर्भ आणि आभार:

संत तुकाराम महाराजांची गाथा
प्रा प्र के घाणेकर - पुस्तक - सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या 
आनंद पाळंदे - पुस्तक - डोंगरयात्रा
ओंकार वर्तले - पुस्तक - सफर मावळची
प्रा प्रभाकर देव - व्याख्यान - प्राचीन महाराष्ट्रः एक पुनरावलोकन
डॉ श्रीनंद बापट - व्याख्यान - प्राचीन महाराष्ट्र
ट्रेक्षितिज संस्था - संकेतस्थळ - www.trekshitiz.com
साईप्रकाश बेलसरे - संकेतस्थळ - www.discoversahyadri.in 
अमित सामंत - संकेतस्थळ - www.samantfort.blogspot.com

अत्यंत महत्त्वाचं असं काही:

माझ्या मराठी  बांधवांनो... चला...
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
  • हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
  • अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
  • आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.

तळ टीप:

वाचकहो !!
  • मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून एक सर्वसामान्य हौशी भटक्या आहे. लिखाणातली माहिती ही लेखाखाली दिलेले संदर्भ आणि माझ्या प्रवासानुभवांच फलित आहे, तेव्हा जाणकारांनी, ह्या लिखाणात शक्य असणाऱ्या त्रुटी/चुकां बद्दल मला क्षमा करून, जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
  • मी कोणी सिद्धहस्त लेखकही नाही, तेव्हा माझ्या अल्पमतीला सुचलेलं माझं हे बाळबोध लिखाणही आपण मोठ्या मनानं गोड मानून घ्यावं.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संपले बालपण माझे

ओढाळ वासरू रानी आले फिरू

एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

दोन दिवस सहा किल्ले

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!

खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...