सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर
पायी असो वा सायकलस्वार व्हावे । आरोग्य सुदृढ आपुले करावे ॥
अवचित समयी वाहनारूढ व्हावे । सह्याद्री ओढीने भारून जावे ॥
भर्राट वारा तो यथेच्छ प्यावा । अंतरीचा गा प्राणाग्नि चेतवावा ॥
आनंदे विहार अवघा करावा । व्यासंग अभ्यास तोही घडावा ॥
इतिहास जाणूनी प्रेरित व्हावे । आयुष्य समृद्ध होऊनी जावे ॥
निसर्ग इतिहास भाषा जपावी । भावी पिढीस जतनासी द्यावी ॥
पश्या म्हणे महाराष्ट्राटन ऐसे व्हावे । क्षण वेचले लेखणीतूनी द्यावे ॥
शेवटच्या ओळीवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की, हे कोण्या महान संतांचं वचन नसून मज पामराचंच बरळणं आहे. पण ते अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आलंय तेव्हा तुमच्यासमोर मांडायला संकोच वाटला नाही. माझ्या अल्पमतीला सुचलेलं गोड मानून घ्यावं ही विनंती. चला !! आजच्या विषयाकडे वळूयात.
शाळा आणि महाविद्यालयानंतर, म्हणजे २००३ साली हातातून आणि पायातूनही सुटलेली सायकल, तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर, २०१३ ला पुन्हा एकदा आयुष्यात आली ती एका नव्या गोजिरवाण्या रूपात आणि हातून गमावत चाललंय की काय असं वाटणारं आयुष्य आणि आरोग्य परत एकदा घरची वाट विचारत पुढच्या काही दिवसातच दारात येऊन उभं ठाकलं. दोन चाकांच्या माझ्या ह्या सोबत्याने मागची सात वर्षे मला निखळ आनंद दिला. साधारण पन्नास किमीच्या त्रिज्येत आजपर्यंत अनेकवेळा भ्रमंती घडवली. आजपर्यंतचा सर्वात लांबचा, १०६ किमी लांब असा खंडाळा प्रवासही घडवला. अर्थातच सामान्य आणि बद्धावस्थेत जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याला साजेसे असे काही लहानमोठे खंडही ह्या सायकलयात्रेत पडलेच.
आणि मग उजाडलं २०२० हे वर्ष, जे मला भ्रमंतीची एक नवी दृष्टी देणारं ठरलं. नियोजनबद्ध महाराष्ट्राटनाला सायकलयात्रेचीही जोड द्यावी असा साक्षात्कार झाला. "नुसतंच वेगवेगळ्या दिशांना रस्त्यांवरून सायकल फिरवून घरी परतण्यापेक्षा चिंचवड-पुण्याच्या परिघात असलेली बघणीय अशी ऐतिहासिक ठिकाणं, इंधनावर खर्च न करता आणि प्रदूषणात भर न घालता पाहावीत असं मनी योजलं". वर्षाच्या सुरुवातीलाच नशिबी आलेल्या सक्तीच्या बंदिवासातून मुक्तता झाली आणि वेळ न दवडता सायकलयात्रेला सुरुवात केली. मग आठवड्या - दोन आठवड्यातून एकदा सरावाची एक-एक पायरी चढत दुर्गाटेकडी, घोरवडेश्वर, कुंडमळा, देहू, आळंदी अशी ऐतिहासिक किंवा भौगोलिक ठिकाणं पाहात सायकलयात्रेला नव्या जोमाने सुरुवात झाली. नुसती सायकलयात्रेला सुरुवात करून भागणार नव्हतं, त्याला लिखाणाचीही जरीकिनार हवीच. तेव्हा आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून माझ्या अल्पमतीला सुचतील तसे माझे सायकलानुभव मी मांडायला घेतोय. आशा करतो की माझा हा लेखनप्रपंच तुम्हाला भावेल आणि रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून तुम्हालाही काहीतरी नवीन अनुभवण्याची ऊर्जा देईल. लिखाणाला योग्य वाटलेला असा हा माझा पहिला सायकलानुभव.
चाकणचा संग्रामदुर्ग आणि प्राचीनतेच्या खुणा जपणारं चक्रेश्वर मंदिर
पहाटे ५.४५ ला घर सोडलं आणि अंधारातच सायकल चाकणचा रस्ता धरून धावू लागली. एकीकडे सायकल तिच्या गतीने धावत होती आणि दूसरीकडे माझं विचारचक्र उलट दिशेला, म्हणजे चाकण आणि संग्रामदुर्गाच्या भूतकाळाकडे धावू लागलं. चाकणच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा पट माझ्या डोळ्यांसमोरून सरकू लागला.
चाकण हे पुणे - नाशिक हमरस्त्यावरचं मोक्याचं ठिकाण. कोकणातून देशावर येणाऱ्या सह्याद्रीतल्या विविध घाटवाटांमधून भामनेर, भीमनेर, घोडनेर खोऱ्यांमध्ये येणाऱ्या मार्गांवर नजर ठेवणं, ह्यासाठी चाकण हे भौगोलिक दृष्ट्या सोयीचं. खरं तर चाकण हे प्राचीन काळापासूनच अस्तित्वात असणारं घाटमाथ्यावरचं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आणि त्याच काळात सुरक्षेसाठी बांधण्यात आलेला चाकणचा भुइकोट !! संग्रामदुर्ग हे नाव मात्र शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात दिलेलं. यादव, खल्जी, बहमनी अशी सत्तांतरं झेलत हा दुर्ग सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजी महाराजांच्या जहागिरीत म्हणजेच आदिलशाहीत आला. पुढे शिवाजी महाराजांनी तो भक्कम दुर्ग आणि तितक्याच तोलामोलाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा अशा दोघांनाही जिंकून घेतलं. फिरंगोजींची किल्लेदारी तशीच चालू राहिली, फक्त इमान आता महाराजांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नांशी म्हणजेच स्वराज्याशी राखायचं होतं.
इ स १६६०, स्वराज्य दुहेरी संकटात सापडलं होतं. खुद्द महाराज पन्हाळगडावर जोहरच्या वेढ्यात अडकले होते आणि इकडे खुद्द आलमगिराचा मामा शाईस्ताखान स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी पुण्यात येऊन बसला. जून १६६० मध्ये खानाने आपली पहिली मोहीम उघडली ती चाकणच्या संग्रामदुर्गाविरुद्धच. खानाचं सैन्य काही हजारांगणती आणि संग्रामदुर्गात केवळ साडेतीनशेची शिबंदी. बाहेरून कुमक येण्याची चिन्हही दिसत नव्हती, पण तरीही पिकल्या केसांचा पण ताठ मानेच्या फिरंगोजीने संग्रामदुर्गाची छोटीशी गढी खानाच्या फौजेविरुद्ध हा हा म्हणता तब्बल पाऊणे दोन महिने लढवली. ५५ व्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट १६६० ला एक प्रचंड स्फोट झाला. संग्रामदुर्गाचा बुरुज, त्यावर उभ्या तोफा आणि बुरजाइतकेच बुलंद मावळे उंच आकाशात भिरकावले गेले. प्रचंड हानी झाली पण तरीही तो पूर्ण दिवस मावळ्यांनी ते खिंडार निकरानं झुंजवलं. दुसऱ्या दिवशी मात्र मूठभर मराठ्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली आणि संग्रामदुर्ग मोगलांच्या स्वाधीन करावा लागला.
गोष्ट इथे संपत नाही !!! फिरंगोजी खिन्न अंतःकरणाने राजगडाच्या पायऱ्या चढत होते. शिक्षा भोगायला ते स्वतःहून महाराजांपुढे हजर झाले आणि शिक्षा पहा काय दिली महाराजांनी !! भरजरी दुशेला, तलवार आणि अदिलशाहीच्या सरहद्दीवर असणाऱ्या भूपाळगडाची किल्लेदारी !! दुसरं कारण ते काय असणार अजून ? गेलेला किल्ला परत मिळवता येईल पण वाढत्या स्वराज्याला सांभाळणारी आणि जणू एखाद्या किल्ल्याप्रमाणेच अभेद्य असणारी फिरंगोजींसारखी माणसं उभं करणं महत्त्वाचं होतं. खानाच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, मोजक्या शिबंदीनिशी संग्रामदुर्गासारखी छोटीशी गढी ५५ दिवस लढवणाऱ्या फिरंगोजींसारख्या झुंजार किल्लेदाराची खरी गरज स्वराज्याच्या सीमेवरच्या भूपाळगडालाच तर होती.
हा सगळा चित्रपट डोळ्यांसमोरून जाईपर्यंत ७ वाजले आणि समोर प्रत्यक्ष संग्रामदुर्गच उभा ठाकला. भरल्या मनानं दुर्गात प्रवेश केला. इतर दुर्गप्रवेशांसारखा, हा प्रवेश मात्र महाद्वारातून न होता भग्न तटातून होत होता. तट फोडून ऐन दुर्गाच्या मधूनच आपल्या शासनाने बनवलेला रस्ता, इतिहास आणि वारश्याबद्दल असलेली आपली अनास्था स्पष्ट दर्शवतो. आधी दुर्गापासून पुढे थोड्याच अंतरावर असलेलं चक्रेश्वर मंदिर आणि त्याजवळच असलेली यज्ञवराह मूर्ती पाहून यावं आणि मग संग्रामदुर्ग निवांत पाहावा असा विचार मनात आला आणि संग्रामदुर्गाची परवानगी घेऊन, सायकल तशीच समोरच्या तटातून बाहेर काढत चक्रेश्वराचा रस्ता धरला.
पाचच मिनिटांत, मूलतः प्राचीन पण सध्याच्या जीर्णोध्दारीत चक्रेश्वर मंदिरापाशी पोहचलो आणि सायकलवरून पायउतार झालो. मंदिराच्या सभामंडपात आणि गाभाऱ्यात जरी अजून प्रवेशाला मनाई असली तरी मंदिर परिसर, समोरचं बांधीव तळं असं सारं न्याहाळत हिंडलो. (चित्र १)
चित्र १: प्राचीन चक्रेश्वर मंदिर |
मंदिर परिसर पाहताना नजरेला घाई झाली होती ती यज्ञवराहाची मूर्ती पाहण्याची आणि ती काही सापडेना. शेवटी गावातलेच एक गृहस्थ समोर दिसले आणि त्यांना मूर्तीचं नक्की ठिकाण विचारून एकदाचा यज्ञवराहासमोर येऊन उभा ठाकलो.
भक्तांच्या संकटांवर मात करण्यासाठी श्रीविष्णूने घेतलेले दशावतार सर्वांनाच सुपरिचित आहेत. त्यातलाच तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. राम आणि कृष्ण ह्यांची मंदिरं अगदी विपुल प्रमाणात आहेत; नृसिंह आणि परशुरामाचीही काही मोजकी मंदिर आढळतात; पण हिरण्याक्षाचा संहार करून पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या वराहावताराची मंदिरं मात्र अतिदुर्मिळ. भारतामध्ये त्यातल्या त्यात खजुराहो आणि उदयगिरी येथील वराहप्रतिमा सर्वश्रुत आहेत; प्राचीन विष्णुमूर्तींच्या प्रभावळीमध्ये अंकित केलेल्या दशावतारातही वराह अवतार पाहता येतो. पण महाराष्ट्रात आढळणाऱ्या वराहमूर्तींच्या नशिबी मात्र उपेक्षाच आलेली दिसते.
वराह मूर्ती दोन स्वरूपात दिसतात. "नृवराह" म्हणजे देह मनुष्याचा आणि मुख वराहाचे आणि "यज्ञवराह किंवा पशुवराह" म्हणजे संपूर्ण प्राणीस्वरूपातली वराह मूर्ती. महाराष्ट्रात मला ज्ञात असलेले दोन यज्ञवराह आहेत. लोणी भापकर येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरात (लोणी भापकरचा यज्ञवराह येथे पहा) आणि चाकण येथील चक्रेश्वर परिसरात.
चक्रेश्वराच्या मूळ प्राचीन मंदिराचे काही भग्नावशेष (चित्र २) आणि यज्ञवराह (चित्र ३) हे सध्या मंदिराच्या प्रवेश कमानीजवळ एकत्रित करून रचून ठेवलेले दिसतात.
चित्र २: प्राचीन मंदिराचे काही भग्नावशेष |
चित्र ३: देखणा यज्ञवराह |
यज्ञवराहाचे चारही पाय तुटलेले असले तरी धड आणि मुख हे आजही सुस्थितीत आहे. यज्ञवराहाच्या डोक्यावरचा मुकुट, कानांवरचा डूल सदृश अलंकार, तोंडातून बाहेर डोकावणारे सुळे, गळ्यातली घुंगुरमाळ आणि पाठीवरची असंख्य विष्णुमुद्रा धारण करणारी झूल ह्यावरून आजही इतकं देखणं वाटणारं हे रूप प्राचीन काळात किती देखणं दिसत असेल ह्याची कल्पना येते. लोणी भपकारच्या मूर्तीप्रमाणे इथेही पायांपाशी आयुधं कोरलेली असावीत जी तुटलेल्या पायांबरोबरच नष्ट झाली असावीत.
यज्ञवराहाच्या बाजूलाच अजून एक मूर्तिविशेष दिसून आलं. त्याचं चित्र घेऊन मूर्तिशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या एका मित्राला दाखवलं आणि कदाचित ते कूर्म अवताराचं शिल्प असावं असा अंदाज बांधला. मुख आणि पाय भंगले असून, पायांच्या ठिकाणी कोरलेली आयुधं झिजल्यामुळे ओळखू येत नाहीत. पाठीवरच्या पिठासनसदृश रचनेचंही प्रयोजन कळत नाही. (चित्र ४)
चित्र ४: यज्ञवराह आणि नंदीच्या मधील कूर्मावतार सदृश मूर्ती |
चक्रेश्वर भेटीत नेत्रसुखाचा पुरेसा अनुभव घेऊन झाल्यावर सायकलने पुन्हा संग्रामदुर्गापाशी आणून सोडलं. पूर्वान्ह प्रहराच्या कोवळ्या उन्हात, पूर्वतट आणि भग्न दरवाजा उजळून निघाला होता. चित्र घ्यायचा मोह झाला आणि लगेच थांबून ते घेऊन टाकलं. (चित्र ५)
चित्र ५: कोवळ्या उन्हात उजळून निघालेला संग्रामदुर्गाचा तट आणि भग्न दरवाजा |
चार-पाच पुरुष उंचीचा दगडी तट, त्यावर पुरुषभर उंचीचं विटांचं बांधकाम, विटांच्या बांधकामातच विविध शस्त्रांचा मारा करण्यासाठी म्हणून बांधलेल्या लहान मोठ्या आकाराच्या जंघ्या आणि त्याच्याच वरच्या बाजूला असणाऱ्या विटांच्याच बांधकामातल्या चर्या हे सारं दर्शन लोभसवाणं वाटत होतं.
दुर्ग-इतिहासाची उजळणी तर आधीच झालेली होती. आता प्रत्यक्ष दुर्गात प्रवेश करून काय काय पाहायचं हा प्रश्न भेडसावत होता कारण, ह्या दुर्गाचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकीच सद्यपरिस्थिती मात्र बिकट आहे. चाकणचा भुईकोट म्हणजे जणू घरबांधणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची फुकट वापरायला मिळालेली खाणच आहे अशी एके काळी इथल्या ग्रामस्थांनी समजूत करून घेऊन आपापली घरे उभी केली आणि इथल्या दुर्ग वास्तू नामशेष झाल्या. एके काळी दुर्गाचं रक्षण करणारा, तटाला लागून असणारा खंदक म्हणजे आजचं स्थानिकांचं कचरा टाकण्याचं ठिकाण झालंय. रस्त्यावरूनच खंदक पाहून दरवाज्यापाशी आलो. भग्न दरवाज्याच्या उजव्या बुरुजातून जाणारा आणि जंघ्यांच्या माऱ्यात असणारा वक्राकार मार्गही कचऱ्याच्या साम्राज्यामुळे आणि अडथळा बसवल्यामुळे बाहेरूनच न्याहाळावा लागला.
दरवाज्याच्या आणि दुर्गाच्या आतील बाजूला असलेल्या ढासळलेल्या वाटेवरून तटाच्या फांजीवर चढलो. दुर्गात प्रवेश करणाऱ्या मूळ वक्राकार मार्गावर लपून मारा करण्यासाठी तटात बांधून काढलेली एक खोलीच समोर आली. (चित्र ६)
चित्र ६: प्रवेशमार्गावर नजर ठेवणारी तटातली जागा |
निम्मं छत ढासळलेलं असून उरलेलं निम्मं मात्र आजही तग धरून उभं आहे. भिंतींना आणि छताला केलेला चुन्याचा गिलावा आजही टिकून आहे. खोलीला असलेल्या जंघ्यांमधून माऱ्यात असलेला दुर्गाचा मूळ प्रवेशमार्ग न्याहळता येतो. (चित्र ७)
चित्र ७: माऱ्याच्या टप्प्यातला प्रवेश मार्ग |
ह्याच जागेवरून संपूर्ण संग्रामदुर्गाचा घेरा दृष्टीक्षेपात येतो. दुर्गाच्या मधोमध शासनाने बनवलेल्या रस्त्याने आज दुर्ग दोन भागात विभागला गेला आहे. त्यातला उत्तरेकडचा, म्हणजेच उजवीकडचा भाग हा काही झाडाझुडपांमध्ये हरवलेली जोती बाळगून आहे (चित्र ८) आणि डावा भाग एखाद्या मैदानाप्रमाणे भकास झालेला दिसतो. ह्याच डाव्या भागात सध्या दामोदर विष्णूचे एक मंदिर आणि त्याच्याच शेजारी एक मशीद आहे. (चित्र ९)
चित्र ८: झुडपांमध्ये हरवलेली वास्तूंची जोती |
चित्र ९: दक्षिण तटाकडील भाग आणि दामोदर विष्णूचे मंदिर |
इथून दुर्ग न्याहाळताना भूतकाळ पुन्हा एकदा समोर दिसू पाहत होता. इथेच कुठेतरी तटावरून किंवा बुरुजावरून फिरंगोजींनी, संख्येने अवघे साडेतीनशे असणाऱ्या पण खानाच्या प्रचंड फौजेला ५५ दिवस पुरून उरणाऱ्या आपल्या मावळ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहण्याची प्रेरणा दिली असेल. सुरुंगाने उडवून दिलेला बुरुज, त्यावरच्या तोफा आणि मावळ्यांना घेऊन आकाशात भिरकावला गेला असेल तेव्हा फिरंगोजी आणि इतर सैन्याला काय वाटलं असेल? आणि तरीसुद्धा तो दिवस झुंजत राहण्यासाठी फिरंगोजींनी आपल्या मावळ्यांना उद्देशून काय शब्द वापरले असतील? छे !! हे सगळं अतर्क्यच आहे. काही क्षणातच वर्तमानात आलो.
पूर्वतटाच्या फांजीवरून उतरून दक्षिण तटावर चढून परकोटाचा भाग पाहावा म्हणून दक्षिण तटापाशी आलो तर तटांवर चढणारा दुहेरी पायऱ्यांचा मार्ग कुलूपबंद करण्यात आलेला दिसला. मग नाईलाजाने जीर्णोध्दारीत दामोदर विष्णू मंदिरापाशी आलो. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर, गाड्यावर बसवलेली एक तोफ ठेवलेली दिसते. (चित्र १०)
चित्र १०: खानाच्या सैन्यावर ह्या तोफेनेसुद्धा मारा केला असेल का? |
मंदिर परिसरात काही वीरगळ (चित्र ११) आणि अजून एक झिजलेली पण तरी देखणी मूर्ती पाहण्यात आली. तिचंही चित्र घेऊन मूर्तिशास्त्राचा अभ्यासक मित्राला दाखवलं तेव्हा कळालं की ही सुद्धा एक दुर्मिळ अशी सूर्यनारायणाची मूर्ती आहे (चित्र १२). एकंदरीत आजच्या दिवसात एक सोडून दोन दुर्मिळ मूर्ती पाहण्याचा योग होता.
चित्र ११: स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या अनामिक वीरांच्या स्मृती |
चित्र १२: दुर्मिळ शेषधारी सूर्यनारायण |
इथे नियोजित मंदिर आणि दुर्गभेट पूर्ण झाली आणि मग आपल्याला पोट नावाचा एक अवयव आहे आणि किमान दिवसातले चार प्रहर तरी त्याची क्षुधाशांती करावी लागते ह्याची जाणीव झाली. भरल्या अंतःकरणाने संग्रामदुर्ग, फिरंगोजी आणि त्या साडेतीनशे मावळ्यांच्या पराक्रमाच्या स्मृतींना मानाचा मुजरा घालून त्या रणतीर्थाचा निरोप घेतला. चाकणमध्येच सकाळची हलकी न्याहारी उरकून पुन्हा एकदा सायकलारूढ झालो आणि सायकल पुन्हा एकदा घरचा मार्ग धावू लागली.
संदर्भ:
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र के घाणेकर
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या - प्र के घाणेकर
Trekshitiz.com
अत्यंत महत्त्वाचं असं काही:
माझ्या मराठी बांधवांनो... चला...
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
- हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
- अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
- आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.
तळ टीप:
वाचकहो !!
- मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून एक सर्वसामान्य हौशी भटक्या आहे. लिखाणातली माहिती ही लेखाखाली दिलेले संदर्भ आणि माझ्या प्रवासानुभवांच फलित आहे, तेव्हा जाणकारांनी, ह्या लिखाणात शक्य असणाऱ्या त्रुटी/चुकां बद्दल मला क्षमा करून, जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
- मी कोणी सिद्धहस्त लेखकही नाही, तेव्हा माझ्या अल्पमतीला सुचलेलं माझं हे बाळबोध लिखाणही आपण मोठ्या मनानं गोड मानून घ्यावं.
Khoop masta
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद !!
हटवाKhoop masta
उत्तर द्याहटवा