आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!
अपरिचित वाघोली, फुलगावचा देखणा घाट आणि तुळापूर बोलू लागलं !!
सवयीनं आठवड्यात एखाद्या दिवशी उषःप्रहरी उठावं आणि अंधारातच एकुटवाणं... नाही नाही !! रानभुलीसवे निघावं. (रानभुली कोण? विसरलात? मग आधी हे वाचा !!) कुठं जायचं ते रानभुलीला नेमकं ठाऊक असतं. अर्ध्या-पाऊण तासात ती मला, माझ्या आवडत्या नेमक्या टेकाडापाशी पोहचवते. आम्ही दोघंही मग अर्ध टेकाड चढून नेहमीच्या धोंड्यावर कोणाची तरी वाट पाहत बसतो. अजूनही अंधाराचंच साम्राज्य असतं. वारा दमून-भागून झोपलेला असला तरी त्याची उणीव हवेतला गारवा भरून काढत असतो. समोर भला मोठा काळसर निळा किंतानाचा पट (कॅनव्हास) क्षितीजापार पसरलेला असतो. त्यावर उगा कोण्या खोडकराने कुंचला फटकारून उडवलेल्या लहान-मोठ्या पांढुरक्या ठिपक्यांसारख्या चांदण्या लुकलुकत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे गावातले काही दिवे उगाच ऐट मिरवत असतात. आणि मग काही क्षणांतच त्याची चाहूल लागते. तो येतो... पांढरा शुभ्र ढगळ अंगरखा, तितकेच शुभ्र डोई-दाढीचे लांबसडक केस, बारीक पाणीदार डोळे, चेहर्यावर सुरकुत्यांचं जाळं, तिच गत हातांची आणि लांबसडक बोटांची !! वय किती असावं? माहीत नाही !! मानवाच्या आकलनापलिकडे !! पण किमान काही कोटी वर्षे तरी असावंच? तेव्हापासून तो रोज येतोय... एकही दिवस न चुकवता... कोण असतो तो? एक चित्रकार !! एव्हाना तो आपल्या रंगसाहित्यासहीत सज्ज झालेला असतो. काही क्षण तो नुसतंच त्या पटाला न्याहाळतो. मग भानावर येत आपला कुंचला रंगात भिजवून समोरच्या त्या किंतानावर रोजच्या इतक्याच कुशलतेने आणि सहजतेने फिरवायला सुरुवात करतो. आधी गडद निळसर.. गडद राखाडी.. मग निळसर तांबूस.. मग त्यात मधोमध एक लालसर पट्टा.. त्याच्या कडेने हलकी केशरी छटा.. असं भान हरपून एका मागेे एक रंगछटा गुंंफत जातो. आता रानभुली आणि मीही त्याचं ते काम पाहण्यात पूर्णपणेे गुंंतून गेलेलो असतो. पुन्हा एकदा तो चित्रकार काही क्षण घुटमळतो... त्याला अचानक काहीतरी सुचतं... अर्ध्या-मुर्ध्या रंगवलेल्या पटावरच्या रंगांवर उठून दिसेल, असा एक लालसर गुुलाबी रंग कुंंचल्यावर माखतो आणि क्षितीजापासून दोन बोटं वरती आणि मधोमध एक लहानगं वर्तुळ चितारतो आणि त्याचा तोच गालात हसतो. आणि मग पुन्हा एकदा त्याला धुंदी चढते आणि गुलाबीसर लाल.. भडक लाल... लालसर केशरी.. सुवर्ण केशरी.. असं त्या वर्तुळालाच तो कितीतरी वेळ रंगवत बसतो. मग पुन्हा एकदा वर्तुळाचा भोवताल.. पुन्हा वर्तुळ.. पुन्हा भोवताल.. असं त्याचं समाधान होईपर्यंत तो रंगकामाशी अखंड समरूप होऊन जातो. एका क्षणी मात्र तो, केलेल्या चित्रकामावर समाधान मानतो आणि मागे वळून मोठ्या आशेने आमच्याकडे पाहतो. आम्हा दोघांंच्या (रानभुली आणि मी) चेहऱ्यावर आपोआप उमललेलं मंद स्मित आणि नजरेतलं समाधान तो नेमकं टिपतो. त्याला अपेक्षित अशी ही पोच पावती मिळाली की पुन्हा एकदा त्याची कळी खुलते आणि समाधानाने तो अंतर्धान पावतो. युगानुयुगे हा असा अरुणोदयाचा रंंगाविष्कार निरपेक्षपणे चितारणारा तो चित्रकार आपल्याला रोज एक भेट देत असतो, ज्याला आपण 'दिवस' म्हणून ओळखतो.
असाच आजचा दिवस म्हणजे एक विशेष भेट !! ही सायकलवारी करावी असं फार आधीपासून डोक्यात होतं. तीन स्मृतीस्थळं कधीपासून खुणावत होती. अंतर ७० किमी भरणार होतं आणि त्यासाठी सरावही पुरेसा झालेला होता, तेव्हा आजचा दिवस ठरवला. रानभुली तर दिवा, पाणी, कुलूप असा सगळा ऐवज चढवून रात्रीच सज्ज होऊन उभी होती. पहाटे पाचाला उठलो, आवरलं आणि साधारण साडेपाचला घर सोडलं. रानभुलीने तिचा नेहमीचा वेग घेतला. पहिला टप्पा होता नगर महामार्गावरचं वाघोली गाव. अंतर होतं अठ्ठावीस किमी आणि पोहचायला लागणारा अपेक्षित वेळ होता दीड तास. जुन्या मुंबई - पुणे महामार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या चढाईने थंडी पळून गेली. महामार्गाला लागलो आणि एका लयीमध्ये खडकीच्या दिशेला रस्ता कापला जाऊ लागला. एक एक करून पिंपरी.. कासारवाडी.. दापोडी.. मागे पडत गेलं. मुळा नदी ओलांडल्यावर महामार्ग सोडून खडकी बाजारामार्गे येरवड्याचा रस्ता धरला. होळकर पुलापाशी मुळा नदी पुन्हा एकदा भेटीला आली. तिथून दहाच मिनिटांत तारकेश्वरापाशी (बंडगार्डन) आलो. तारकेश्वराला धावत्या सायकलवरूनच, नुसतं मान लवून दंडवत घातला आणि नगर महामार्ग धरला. इतरवेळी गजबजलेला असणारा नगर रस्ता आज रविवार असल्याने अगदी निवांतपणे मोकळा श्वास घेत होता. एका मागे एक असणारे चढ-उतार पार करत अगदी ठरल्या वेळेत म्हणजे सात वाजता, वाघोलीत जे ठिकाण पाहायचं होतं तिथे येऊन पोहचलो. महामार्गाला लागूनच रस्त्याच्या डावीकडे एक बांधीव तळं. त्याच्या पल्याड होतं ग्रामदैवत वाघेश्वराचं घाटदार देऊळ आणि आजचं पहिलं स्मृतिस्थळ, "सरदार पिलाजीराव जाधवरावांचं दगडी बांधकामातलं डौलदार स्मारक" (चित्र १).
चित्र १: वाघेश्वर आणि पिलाजीराव जाधवराव स्मारकापुढे रानभुली |
तळ्याच्या पुढून डावीकडे वळल्यावर मंदिर परिसराचं भव्य प्रवेशद्वार सामोरं आलं. प्रांगणात प्रवेश केला आणि प्रचंड वृक्षांनी सावली धरलेल्या फरसबंदी वाटेने मंदिरापाशी आलो. प्रशस्त, अतिशय स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवलेलं मंदिर प्रांगण पाहून फार प्रसन्न वाटलं (चित्र २).
चित्र २: प्रशस्त मंदिर प्रांगण आणि देखणी दीपमाळ |
कलाकुसरयुक्त द्वारचौकटीचा, मध्यभागी कीर्तिमुख धारण करणारा उंबरठा ओलांडून रेखीव खांबांनी तोलून धरलेल्या सभामंडपात प्रवेश करताच एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटलं. मोजक्या ग्रामस्थ भाविकांशिवाय मंदिरात कोणीही नव्हतं. गाभाऱ्यातल्या शांत आणि सुवासिक वातावरणात प्रवेश करून देवापुढे काही क्षण नतमस्तक होऊन शुचिर्भूत झालो. ठरलेल्या वाराला, गर्दीच्या दिवशी देवळात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा हे असं दर्शन कितीतरी पटीने सुखावणारं वाटतं. देवाचा आशिर्वाद घेऊन मंदिराबाहेर पडलो आणि तळ्याकाठी असलेल्या पिलाजींच्या स्मारकापाशी आलो (चित्र ३).
चित्र ३ - सरदार पिलाजी जाधवराव स्मारक |
पिलाजीरावांचा जन्म इ.स. १७०७ सालचा. अर्थातच त्यांची कारकीर्द छत्रपती शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, चिमाजी अप्पा आणि नानासाहेब पेशवे ह्यांच्या हाताखाली घडली. फितूर सरदार चंद्रसेन जाधव आणि यमाजी थोरातांना पकडल्याबद्दल पिलाजींना सासवडजवळील दिवे गावालगत इनामदारी देण्यात आली. दिवे घाट चढून गेल्यावर उजव्या हाताला असणारी जाधव गढी (सध्याचं पंच-तारांकित हॉटेल) ही ह्याच पिलाजी जाधवरावांची. इ.स. १७२४ च्या निजामाविरुद्धच्या युद्धात थोर कामगिरीमुळे पिलाजींचा दरारा वाढला. वाघोली हे गावही त्यांना इनाम म्हणून मिळालेलं आणि पुढे ह्याच वाघोली गावात ३ जुलै १७५१ रोजी पिलाजींची अखेर झाली. त्यांच्या वंशजांनी वाघेश्वराच्या राऊळाजवळ तळ्याकाठी त्यांची ही अतिशय कलापूर्ण समाधी उभारली. आजच्या आपल्या, एक मराठी म्हणून मानानं जगण्यामागे पिलाजींसारख्या कितीतरी ज्ञात-अज्ञात सरदार आणि मावळ्यांचे अपार कष्ट, समर्पित जीवन आणि प्रसंगी जीवांची बलिदानं आहेत, ह्याचं आपल्याला किती सहज विस्मरण होतं आहे, असा एक विचार सहज मनात आला. रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून जमतील तेवढ्या स्मारकांना उभ्या आयुष्यात निदान एकदा तरी भेट देऊन, क्षणभर नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानणं हे आपल्याला नक्कीच शक्य आहे. कृतज्ञ भावनेने पिलाजींच्या स्मारकापुढे हात जोडून नतमस्तक झालो आणि त्या प्रसन्न प्रांगणाचा निरोप घेतला.
वाघोलीतच अमृतपेय चहा घेऊन पुढचा प्रवास सुरु केला तेव्हा ७.३० वाजले होते. पुढचा पल्ला होता साधारण चौदा किमी अंतरावरचं फुलगाव. कोवळ्या उन्हात शेकत आणि पुन्हा एकदा महामार्गाचे चढउतार पार करत नगरच्या दिशेला प्रवास सुरु केला. वीस एक मिनिटांतच लोणीकंद गाठलं आणि महामार्ग सोडून रानभुली आळंदीच्या मार्गावर धावू लागली. पुढे दहा-पंधरा मिनिटांत फुलगावचा फाटा आला आणि आळंदी मार्गापासून उजवीकडे वळून गाव पार करत आजच्या दुसऱ्या नियोजित स्थळापाशी पोहचलो. इथे पाहायचा होता तो भीमातीरावर बांधलेला "पेशवेकालीन चिरेबंदी घाट". प्रवेशकमानीपाशीच रानभुली चित्रासाठी अडून बसली, मग तिथे एक चित्र घेऊन टाकलं (चित्र ४).
चित्र ४: फुलगावच्या कमानी घाटाची प्रवेश कमान |
कमानीतून आत प्रवेश केला आणि सुबक बांधणीच्या कमानी घाटाचा आटोपशीर विस्तार नजरेच्या टप्प्यात आला. ह्या वास्तूबद्दल लिखित स्वरूपात फार माहिती मिळत नाही पण दर्शनाने नेत्रसुख मात्र भरपूर मिळतं. प्रवेश कमान ही घाटाच्या अगदी मध्यावर असून कमानीच्या दोन्ही बाजूला ६-६ ओवऱ्या आणि पुढे बांधकाम काटकोनात वळवून पुन्हा ७-७ ओवऱ्या आहेत. घाटाच्या टोकांशी दोन भक्कम बुरुज बांधलेले असून त्या बुरुजांवर चढायला शेवटच्या ओवऱ्यांच्या पोटातून फारच सुंदर असे दगडी जिने बांधलेले आहेत. उजवीकडच्या बुरुजावर जाऊन एक छान चित्र घेऊन टाकलं (चित्र ५).
चित्र ५: घाटाचा आटोपशीर विस्तार |
भीमेच्या वाढलेल्या पातळीमुळे, घाटाने बंदिस्त केलेलं फरसबंदी पटांगण आणि नदीपात्रात उतरणाऱ्या पायऱ्या, बुरुजावरूनच पाहून समाधान मानलं. समोरच्या बुरुजावर छान कोवळं ऊन पडलेलं होतं, तेव्हा उतरून तिथे गेलो आणि बुरुजातून केलेल्या पायऱ्या आणि खांबांमध्ये दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे चित्रात टिपले (चित्र ६).
चित्र ६: बुरुजाशेजारच्या ओवरीतून वर नेलेला दगडी जिना |
रानभुली आणि मी सोडून घाटावर अजून कोणीही नव्हतं. तिथलं कोवळं ऊन, रम्य वातावरण आणि निरव शांततेचा काही क्षण मनसोक्त आस्वाद घेतला आणि पुढच्या स्मरणस्थळाच्या ओढीने निघालो तेव्हा ८.१५ वाजलेले होते. पुढचं स्मृतीस्थळ फुलगावपासून अगदीच जवळ, म्हणजे अवघ्या तीन किमी अंतरावर होतं आणि ते म्हणजे "तुळापूर". पंधराच मिनिटांत तुळापुरात दाखल झालो (चित्र ७).
चित्र ७: तुळापूरच्या स्मारकाचं प्रवेशद्वार |
मिश्रस्मृती उराशी बाळगून असणाऱ्या तुळापूराकडे सांगण्यासारखं इतकं काही आहे की, आम्ही तिकडे पोहचायचचा अवकाश आणि ते स्थळ स्वतःच घडाघडा बोलू लागलं... तिथला चिरा नि चिरा कंप पाऊ लागला... पाझरू लागला... जणू उरात साठवलेल्या स्मृती पांथस्थांशी बोलून त्याला हलकं व्हायचं होतं. तुळापूर नावाचा तो ग्रामपुरुष त्याच्या रांगड्या मऱ्हाटमोळ्या भाषेत भरभरून बोलू लागला आणि मी एखाद्या लहान पोरासारखा ऐकू लागलो.
"ये लेकरा ये !!! माज्या ह्या पावनभूमीत तुजं सावगत हाय बघ !! पावनभूमी म्हनन्यागत आसं काय घडलया तरी काय हितं? तर माज्या बाबा.. येक लई ग्वाड !! दुसरा त्यितकाच कालीज चिरनारा - म्हंजी म्हराट्याच्या इतिहासातला जनु लई वंगाळ !! अन् तिसरा म्हराट्याच्या झुजारुपनाचा !! आसं तीन परसंग हायेत. पर म्या त्याच्याबी लई आगुदरपासून हाय बरका हितंच !! म्हंजी ह्ये आसं पारचिन कालापासनं !! त्या येळेपासूनच लोक मला "नागरगाव" म्हनत आल्येत... भीमा, भामा अन् इंद्रायनी ह्या मावळल्येकींच्या त्रिवेनी संगमावरचं पुन्यख्येत्र - "नागरगाव" !!
तर बाळा.. १६३३ चं वरुस व्हतं ते. आदलशाही फौजंच्या संगतीनं मोंगल निजामशाही बुडवाया आलं हुतं. नव्हं नव्हं.. बुडवलीच पार निजामशाही. पर आपलं थोरलं धनी, शाहजी राजांनी येक डाव ख्येळला. आदलशाहीतलं लई मातबर सरदार, मुरार जगदेव अन् रणदुल्लाखानाशी मसलती सुरु केल्या. कशापाई? तर निजामशाहीला वाचवाया अन् मोंगलास्नी हितून हुसकून लावाया, अन् त्यात राजास्नी येश भी घावलं. मंग राजांनी, निजामशाहच्या मुर्तजा नावच्या येका वंशजाला जीवधन किल्ल्यावरल्या कैदतनं सोडावून पेमगिरी किल्ल्यावर आनलं अन् त्याला मांडीवर बसवून, सवतः निजामशाहचा वजीर म्हनून सवतंत्र कारभार सुरु क्येला. म्हराटी सवराज्याचा शिरीगनेशा झाला जनु. राजांचं आदलशाहीतलं जिगरी दोस्त, मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान, या दोघांचीबी लई मोलाची मदत व्हत हुतीं. मुरार जगदेव हे विजापूर दरबारातलं लई मोठं सरदार, त्यांनला "महाराज राजाधिराज" असा मान व्हता. देव-धर्मबी लई करायचे मुरारपंत. अन् आशातच, २३ सप्ट्येबर १६३३ ला सूर्यगर्हान लागनार व्हतं. मुरारपंतास्नी वाटलं, सवतःची सोन्यानं तुळा करून दान-धर्म करावा, अन् त्या पुन्यकामासाठी त्यास्नी माजं हे त्रिवेनी संगमावरचं नागरगाव मनात भरलं. पन त्या येळेला, माजी जिमीन व्हती निजामशाहीत, तंवा मुरारपंतानं शाहजी राजास्नी आपली विच्छा बोलून दावली. राजांनी परवानगी तर दिलीच अन् तुळादानाला सवतः हजर राहन्याचंबी कबूल क्येलं. तुळादानाचा दिस उगावला. सोनं, रूपं, धान्य ह्या अशा चौवीस पर्दाथान्नी मुरारपंताची तुळा झाली अन् त्याचं ढीग च्या ढीग पंतानं दान क्येलं. दानात काय कमी पडाया नगं म्हनून पंतानं हत्तीची तुळा करायचं ठरिवलं. आता ह्ये हत्तीएवढालं परचंड धूड प्येलनारा काटा मिळाया तर पायजेन? तेव्हा शाहजीराजांनं युगत सांगितली, दोन होड्या येकमेकीस्नी बांदून भीमेच्या पान्यात हुब्या क्येल्या अन् त्यावर फळ्या टाकून चढावला हत्ती !!! होड्या जिथवर बुडाल्या, तिथवर निशानी काढाया सांगितली. मंग हत्तीला उतरावला अन् पुना होडया निशानीपत्तुर बुडेतोवर दानाचं ढीग होडीत ओताया सांगितलं. मुरारपंताची विच्छा पूर्न जाली अन् मंग ह्या तुळादानाचं स्मरन म्हनून, त्यादिसापासून माजं नाव जालं "तुळापूर". मनाचं न्हाई सांगत, साख्यिदार हाय ह्या घटनंला, त्यो पहा भीमाकाठावर त्या सुबक रावळात बसलाय त्यो संगमेशर महाद्येव (चित्र ८) !! जा लेकरा दरशन घ्येवून ये, मंग फुडचा परसंग सांगतो !!
चित्र ८: संगमेश्वर महादेवाचं सुबक चिरेबंदी राऊळ |
अतिशय सुबक अशा त्या चिरेबंदी राऊळाच्या, गाभाऱ्यातल्या भक्तिमय वातावरणात विराजमान असलेल्या त्या देवाधीदेवाचं दर्शन घेतलं अन् पुन्हा एकदा त्या ग्रामपुरुषाचं बोलणं ऐकायला म्हणून बाहेर आलो, तर त्या ग्रामपुरुषाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. काय झालं म्हणून पुसायला गेलो तर काही न बोलता तो काही काळ तसाच अश्रू ढाळत राहिला आणि मग कसंबसं स्वतःला सावरून बोलता झाला.
पोरा !! कसं सांगू कळंना !! काय आसं पाप घडलं माज्या कडनं कुना ठावं, जे हा परसंग पाहनं माज्या नशीबी आलं. आपलं धाकलं धनी शंभूराजं तिकडं दूर कोकनातल्या संगमेशरी ग्येलतं. मुक्रबखानानं कुनालाही सुगावा लागू न द्येता डाव साधला. २ फेब्बूर्वारी १६८९ च्या दिसाला संगमेशरावर हल्ला करून शंभूराजं अन् कवी कलुषास्नी धरून त्येंच्या मुसक्या बांधल्या. घाट येंगुन त्या मुकर्याखानानं तेराव्या दिसाला, म्हंजी १५ फेब्बूर्वारीला दौंडाजवळ पेडगावच्या किल्ल्यात आपल्या शंभूराजाला अन् कलुषाला औरंग्यासमोर हुबं केलं. इतक्या दिसात कुनी कसं आपल्या धन्याला सोडवाया धावलं न्हाई काय कळंना. पेडगावच्या किल्ल्यात त्या औरंग्यानं !! मुडदा बशीवला त्या औरंग्याचा !! त्यानं शंभुराजं अन् कलुषाची गाढवावरनं धिंड कहाडली. सवराज्यातलं सारं किल्लं सोडून द्यायला सांगितलं अन् यवनी धर्मबी कबुल कराया सांगितलं. पर आपलं शंभूराजं अन् कलुषा झुकलं न्हाई. कवी कलुषा तर लई काहीबाही बडबडायचा त्या औरंग्याला, मला मारून माझ्या राजाला सोड बोलायचा. एक दिस तर कलुषा त्या औरंग्याला काय बोलला बघ.
"पाप कर्म करके सदा कहता बिस्मिल्लाह... ढोंग किया, टोपी सिया मिले नाही अल्लाह... निज दिमाग को टॉंक लो, पागल है पातशाह"
म्हंजी, "पाप करून तू बिस्मिल्ला बोलतो... नुसतं टोप्या शिवायची नाटकं करून अल्ला मिळत नसतो... पातशाह पागल झालाय, त्याच्या मेंदूलाच टाके घाला".
औरंग्या लई चिडला ह्ये ऐकून, त्यानं जीभच छाटली कलुषाची. ह्यो असा कवी कलुषा, मरनाच्या दारातबी त्यानं आपल्या राजाची संगट न्हाई सोडली.
फुडं ३ मार्चच्या दिसाला औरंग्या शंभूराजाला अन् कलुषाला घिऊन हिकडं माज्या जिमनीवर आला. आपल्या धन्याला त्ये तसं पाहून, असं वाटलं, हातपाय आसतं तर त्या औरंग्याच्या नरडीचा घोट घ्येवून सोडावलं आसतं आपल्या राजाला, पर नुसतं बघन्यावाचून उपाव न्हवता. फुडचं सांगन्याआधी माजी जीभ झडुन जाऊदे रं संगमेशरा !! हितं आल्यावर तर त्या औरंग्यानं दोगांचंबी लई हाल हाल क्येलं. तापलंल्या सळईनं आधी कलुषाचं अन मंग शंभूराजाचं, आसं दोघांचंबी दोन्ही डोळं कहाडलं. हिकडं ह्ये असं अस्तानी बी तिकडं आपल्या ह्या राजाची रानी येसूबाई दुक्ख सोडून रायगड लढवत ऱ्हायली. म्हराट्यांनी येकबी गड औरंग्याला दिला न्हाई, झुजत ऱ्हायले. कुनी शिकवलं ह्ये? आपलं थोरलं राजं शिकवून ग्येलं ह्ये आसं झुजायाला. शंभूराजंबी त्याच थोर राजाचं ल्येकरू. आपला धर्म बुडू द्यायचा न्हाई हीच शिकवन होती त्यास्नी. लई तरास सहन करत ऱ्हायलं, पर झुकलं न्हाई. ह्ये इक्त सोप्पं काम न्हाई बाळा !! आपलं तुकाबाबा सांगून गेलंय, "येथे पाहीजे जातीचे.. येऱ्यागबाळ्याचे काम नोहें.." अस्सल म्हराट्याची जातकुळी ही.
अन् फुडं त्यो ११ मार्चचा काळकुट दिस उगावला. औरंग्याच्या हशमांनी आधी कवी कलुषाला ह्या हितंच भीमेच्या दरडीवर नेऊन त्याच्ये तुकडे तुकडे करून टाकले. मग सांजावलं, पाखरं आपल्या डोणीत गुपचूप जाऊन बसली, टिटव्या टिटिव्ह टिटिव्ह करून आरडत ऱ्हायल्या, कुत्री ईव्हळु लागली, सुर्व्या येरवळीच बुडाय ग्येला, भीमेचा डोह भीतीनं अंधारात दडून बसला. हशमांनी राजांना दरडीवर आनलं, औरंग्या समूर हुबा व्हता. शंभूराजं दरडीवर शांतपनं "जगदंब.. जगदंब.." आसं जप करत हुबं हुतं. मरनाचं भ्या कवाच पळून ग्येलं हुतं, जनु थोरलं म्हाराजांनी आपल्या शंभू बाळास उराशी घट्ट धरलं हुतं. औरंग्यानं इशारा क्येला, हशमांनी "दीन.. दीन.." करत शंभुराज्यावर वाघनख्या, कटारी चालवाय सुरु क्येली, कातडी सोलू लागली, रक्ताचे पाट वहाया लागलं. आपलं राजं तरी शांतच.. दात होट दाबून सहन करीत ऱ्हायलं. अन् सपासप तलवारी चालल्या. शरीराचा ख्येळ संपला. धाकलं धनी थोरल्या म्हाराजाच्या कुशीत जाऊन झोपलं. त्या पल्याडच्या वढू गावच्या लोकांनी लई धाडसानं आपल्या शंभूराजाचं शरीराचं तुकडं गोळा क्येलं अन् थितंच आग्नि दिला. पार इस्कोट झाला रं पोरा !!! पार इस्कोट झाला !!!
तुळापूरच्या ग्रामपुरुषानं फोडलेला हंबरडा ऐकून डोळ्यातनं घळाघळा आसवं वाहू लागली. आम्ही दोघांनीही काही क्षण अश्रूंना असंच मुक्तपणे वाहू दिलं आणि मग पुन्हा एकदा तो हळवा ग्रामपुरुष एक मोठा श्वास घेऊन बोलू लागला.
त्या औरंग्यानं ह्ये सगळं म्हराट्यांना शरन यायासाठी क्येलं. पर परणाम उलटाच झाला. म्हराटा पेटून हुबा ऱ्हायला. गवता-गवताला जनु तलवारी अन् भालं फुटलं. ह्या हितंच म्हराट्यांनी येक पराक्रम क्येला. शंभूराजाच्या बलिदानानंतर पाचच महीनं झालं हुतं, औरंग्याची छावनी हितुन हालली नव्हती. अन् एक दिस आपल्या संताजी घोरपड्यानं छावनीवरच हल्ला क्येला. संताजी औरंग्याच्या तंबूतच शिरला, पर त्या औरंग्याचं नशीब की त्यो तंबूत न्हवता.. न्हायतर त्याच येळेला अल्लाकडे ग्येला आसता. औरंग्या वाचला म्हून चिडून संताजीनं त्याच्या तंबूचं सोन्याचं कळसच छाटलं अन् राजाराम महाराजांकडं पाठवून दिलं.
ल्येकरा !! ह्ये आसं काय काय घडून ग्येलं बघ ह्या हितं.. इक्तं सगळं सांगायाचं हुतं !! आता जरा हलकं वाटाया लागलंय बघ. पोरा !! लई उशीर झाला.. जा जा.. आपल्या शंभूराजाचं त्ये स्मारक हाय ते बघ.. थितं डोकं टेकाव अन् ये पुन्हा कधीतरी आसंच मला भेटाया !! राम राम !!
शंभूछत्रपती आणि कवी कलश यांच्या बलिदानाप्रित्यर्थ उभारलेल्या स्मारकाशी गेलो (चित्र ९).
चित्र ९: शंभूछत्रपतींचं बलिदान स्मारक |
स्मारक भरल्या अंतःकरणानं पाहून बराच वेळ नतमस्तक राहिलो. अंगावरचा काटा आणि डोळ्यातली आसवं अजूनही तसेच होते. भानावर येऊन, महतकष्टाने तिथून पाय उचलून आणि तुळापूरच्या त्या ग्रामपुरुषाचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरु केला तेव्हा ८.४५ झाले होते. रानभुली आळंदीकडे धावू लागली. आजची नियोजित स्मृतिस्थळं इथे पाहून झाली होती. अकरा किमी अंतरावरच्या आळंदीत ९.३० ला पोहचून न्याहारी उरकली आणि पुन्हा शेवटचं १७ किमी अंतर कापत साधारण ११ वाजेपर्यंत घर गाठलं.
परतीचा संपूर्ण प्रवासभर, त्या ग्रामपुरूषाचं ते भरभरून बोलणं आणि बाबासाहेबांचं एक वाक्य कानात घुमत राहिलं... "इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच." खरंच... ही ऐतिहासिक स्थळं, इथले दगडी चिरे, मातीचा एक-एक कण, नद्या, वारा हे इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि ते आपल्याशी बोलतात देखील... फक्त आपली ऐकून घेण्याची इच्छा हवी. आजचा दिवस अशाच एका अनुभवाची प्रचिती येऊन सार्थकी लागला होता.
अत्यंत महत्त्वाचं असं काही:
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
- हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
- अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
- आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.
तळ टीप:
- मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून एक सर्वसामान्य हौशी भटक्या आहे. लिखाणातली माहिती ही लेखाखाली दिलेले संदर्भ आणि माझ्या प्रवासानुभवांच फलित आहे, तेव्हा जाणकारांनी, ह्या लिखाणात शक्य असणाऱ्या त्रुटी/चुकां बद्दल मला क्षमा करून, जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
- मी कोणी सिद्धहस्त लेखकही नाही, तेव्हा माझ्या अल्पमतीला सुचलेलं माझं हे बाळबोध लिखाणही आपण मोठ्या मनानं गोड मानून घ्यावं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा