शीर्षक वाचून, "फारच लवकर
कळालंय ह्याला !!" अशी तुमची समजूत होणं स्वाभाविक आहे. पण मनातून अशाच भावनेची
स्पंदनं निर्माण होतायेत. बालपण संपत चाललंय अशी चाहूल लागू पाहतेय.
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ।
खिडकीवर धूरकट तेव्हा कंदील एकटा होता ।।
कवी ग्रेसांच्या ह्याच ओळी डोक्यात
घोळतायेत. "वेळ" आणि "कारण" मात्र खूपच वेगळं आहे आणि त्याला
ग्रेस असते तर त्यांनीही हरकत नक्कीच घेतली नसती. माझ्या ह्या अवस्थेचं कारण
प्रथमदर्शी हास्यास्पद वाटू शकेल किंवा असेलही. पण कदाचित पूर्ण वाचून झाल्यावर
तुम्ही माझ्याशी एकमत होऊ शकाल. एकमत व्हावंच अशी अपेक्षा मात्र नाही.
तर थोडक्यात सांगायचं झालं तर,
माझ्यासाठी कवितेतील "खिडकी"
म्हणजे "खंडाळा किंवा बोर घाटातला जुना लोहमार्ग".
आणि "धूरकट कंदील" म्हणजे
५-एप्रिल-२०२० ह्या दिवशी इतिहासजमा झालेला "अमृतांजन पूल".
(आता ह्या कल्पनेतून पुन्हा एकदा
कवितेच्या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करून बघा)
कधी कधी निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा
जीव गुंतलेला असतो. इथे एक शंका आहे खरं तर... आपल्याला निर्जीव वाटणाऱ्या गोष्टी
ह्या खरंच निर्जीव असतात का? की फक्त मानवनिर्मित सजीवाच्या व्याख्येत ते बसत नाही म्हणून निर्जीव? मीच ह्या जगात असा आहे, की अजून कोणाला असा प्रश्न पडतो? असो, तर मुद्दा हा की मला अश्या काही तथाकथित निर्जीव गोष्टींना
"निर्जीव" म्हणायला पण जीवावर येतं. कारण इथे त्यांच्यात आणि माझ्यात
संवाद होत असतो, दरवेळी
भेट देण्याची ओढ असते, काहीतरी
जन्मोजन्मीचं नातं आहे ह्या जागेशी असं वाटत असतं. किल्ले, लेण्या, देवळं, सह्याद्रीचा
काळाकभिन्न कातळ अश्या अनेक गोष्टी तर ह्यात मोडतातच पण पुणे ते मुंबई लोहमार्ग, खंडाळा किंवा बोर घाट, घाटातले बोगदे आणि अमृतांजन पूलासारखे
अनेक पूल ह्याही गोष्टी ह्याच प्रकारात मोडतात. हे असं असण्यामागे मला किमपि
आश्चर्य वाटत नाही आणि त्याची कारणं पण अगदी सरळ आहेत. एकतर सह्याद्रीच्या कुशीत
वसलेलं आणि पुणे-मुंबई लोहमार्गावरचं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन - कर्जत - हे आमचं गाव, नंतर वडिलांच्या
नोकरीनिमित्ताने तळेगांव (दाभाडे) (१९८० पण माझा जन्म १९८१) आणि नंतर चिंचवडला
(१९८६) झालेलं स्थलांतर. मग सुट्टीच्या निमित्ताने लहानपणापासून घडणारा चिंचवड -
कर्जत - बदलापूर रेल्वेप्रवास. त्यात काका आणि वडील हे पक्के इतिहास आणि
किल्लेवेडे, त्यामुळे
रेल्वे प्रवास हा अगदी कळायला लागल्यापासून गाडीच्या दरवाज्यात बसूनच घडू लागला
आणि तो प्रवास असाच (दरवाज्यात बसूनच) करायची गोष्ट आहे असे संस्कारही नकळत घडले.
कळायला लागल्यापासून म्हंटलं तरी किमान ३० पेक्षा जास्तं वर्ष झाले हेच संस्कार
टिकून आहेत आणि आजही अनुसरले जातात. पण हा झाला संस्कारांचा अर्धा भाग. मुख्य
उद्देश म्हणजे वाटेवरचे किल्ले,
लेण्या, ऐतिहासिक
ठिकाणं इत्यादींची तोंडओळख, कालांतराने
उजळणी आणि मग न चुकता हात जोडून दर्शन. घोरावडेश्वरापासून ते ताहुलीपर्यंत सगळ्या
ऐतिहासिक ठिकाणांचा ह्यात समावेश होतो. खूप मोठी यादी आहे ही. ह्यातली खूप ठिकाणं
बघायची बाकी आहेत अजून. वेळ मिळेल तसं बघणं चालू आहे. कोंडाणे लेणी, १६ नंबर बोगद्यावरचा गंभीरनाथ, जाम्रुग आणि पळसदरीमधला सोनगिरी किल्ला
ह्या काही गोष्टी तर मागच्या काही वर्षातच बघून झाल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा
रेल्वे ट्रॅक तुडवून झाला आहे. वाढत्या वयाबरोबर, इतिहास म्हणजे नुसतं किल्ले, लेण्या, देवळं
इतकंच नसून त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे कळायला लागलं आणि मग काही नवीन नवीन
प्रश्न पडू लागले ज्याची उत्तरं काका आणि वडिलांकडे पण नव्हती.
त्यातल्याच एक प्रश्न म्हणजे
"अमृतांजन पूल". लहानपणापासून हा पूल बघतोय पण त्या पुलावरून कधीच कुठली
गाडी जाताना पहिली नव्हती. मोटारगाड्या ह्या पूलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून
धावताना दिसतात. मग हा पूल कशाला बांधला? ह्याचं उत्तर काही काका आणि वडिलांकडून मिळत नव्हतं. मोठा होत गेलो
तसं त्यात आणखी २ प्रश्नांची भर पडली, ते म्हणजे हा पूल कोणी आणि कधी बांधला? आता आयुष्यात गूगलबाबा नावाचा एक जाणकार येऊन बरीच वर्षे झाली होती.
साधारण २०१०-११ वर्षी हुशार-भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) आयुष्यात आला. रिकाम्या
वेळात गूगलबाबांना कामाला लावायची सवय लागली आणि मग आयुष्यातल्या अनुत्तरित
प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात झाली. साधारण २०१३-१४ च्या आसपास खंडाळा, बोर घाट, रेल्वे, अमृतांजन
ब्रिज अशी शोधमोहीम गूगलबाबांवर सोपवली. आणि एक दिवस !!! काही प्रकाशचित्रे
(फोटोज्) गूगलबाबांनी आम्हाला दाखवली (चित्र क्रमांक १ व २).
|
चित्र क्रमांक १ |
|
चित्र क्रमांक २ |
ही प्रकाशचित्रे बघून
माझी अवस्था काय झाली हे काही सांगायला नकोच. इथून पुढे मग एक एक दुवे पटापट सापडत
गेले. खूप प्रकाशचित्रे, ब्रिटिशकालीन
दस्तऐवज सापडत गेले.
|
चित्र क्रमांक ३ |
सगळ्यात विशेष म्हणजे ब्रिटिशांनी १९३० साली प्रकाशित केलेला
एक लोहमार्गाचा नकाशा (चित्र क्रमांक ३) आणि मग इतक्या वर्षांपासूनच्या
अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं गोष्टीरूपाने डोळ्यासमोर उभी राहीली. आणि उभा राहिला
"ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे" (जी. आय. पी. आर.), त्यांनी खंडाळा (बोर) घाटात १५० वर्षांपूर्वी बांधलेला
पहिला लोहमार्ग आणि अमृतांजन पुलावर बांधलेल्या "रिव्हर्सिंग स्टेशनचा" इतिहास. रिव्हर्सिंग स्टेशन बद्दल थोडक्यात लिहीणं हे जरा अवघड काम आहे. एक वेगळा लेखच लिहावा लागेल त्यासाठी. पण तरी प्रयत्न करतो. खंडाळा ते मंकी हिल दरम्यानचा आज वापरात असणारा लोहमार्ग हा १९२९ साली बांधला गेलाय. पण त्याच्याही किमान ६५ वर्षे आधी म्हणजे १८६३ च्या आसपास बोर घाट बांधून पूर्ण झालेला होता आणि त्यावेळी मात्र खंडाळा ते मंकी हिल ह्या दोन थांब्यांमधला मार्ग आजच्या मार्गापेक्षा वेगळा होता. नकाशामधे हे दोन्ही मार्ग दाखवलेले आहेत (खालच्या डाव्या भागातील सूचीनुसार पहा). मुंबईकडून येणारा जूना मार्ग (नकाशात वरच्या डाव्या बाजूने येणारा) हा मंकी हिल नंतर उजवीकडे वळून अमृतांजन पूलावर आणलेला होता. ह्या पूलावर रिव्हर्सिंग स्टेशन बांधलेले होते. इथे पूर्वी वापरात असलेले कोळशाचे इंजिन निघून गाडीच्या उलट दिशेला लावले जात असे. अजून एक काम म्हणजे कोळशाच्या त्या इंजिनाला पूर्ण ताकदीनिशी घाट चढून आल्यावर पाण्याची गरज पडे, तीही सोय ह्या रिव्हर्सिंग स्टेशनवर केलेली होती. त्यानंतर हा मार्ग अमृतांजन पूलाला खेटून उभा असलेल्या कपालेश्वर कड्याच्या पोटातून सध्याच्या पुण्याकडे येत असलेल्या दृतगती मार्गावरील बोगदा आणि पुढची चढण चढून खंडाळा गावातील तळ्याच्या डाव्या काठाने (सध्या इथे वस्ती आहे) खंडाळा स्टेशनात येत असे. पुढे १९२० साली पुणे-मुंबई लोहमार्गाचे विद्युतीकरण करायचे ठरले त्यावेळी वार्षिक ५ लाख रूपये आणि वेळ बचत करण्यासाठी रिव्हर्सिंग स्टेशन वगळून ६६ लाख रूपये खर्चून सध्याचा नवीन मार्ग बनवला गेला. हे काम १९२९ ला पूर्ण झाले आणि रिव्हर्सिंग स्टेशन हे निष्क्रिय होऊन कालबाह्य झाले.
इतक्या सगळ्या अभ्यासानंतर वेध लागले होते ते ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात जाऊन
पाहण्याचे, पण
योग काही येत नव्हता. केलेला अभ्यास संग्रही जाऊन बसला (थोडक्यात म्हणजे विस्मृतीत
जाऊन बसला).
२०१६ फेब्रुवारी महिना उजाडला आणि एक
दिवस (शनिवार, २७-फेब्रुवारी)
माझा भटकंतीमधला जोडीदार, माझ्या
भावाचा बदलापूरहून फोन आला. नेहमीप्रमाणे हर्षद नावाच्या ह्या भटक्या अतृप्त
आत्म्याचं भूत "कुठेतरी भटकून येऊ" म्हणत माझ्या मानगुटीवर बसलं. बरं
फोन पण ह्याने संध्याकाळी केला होता. आता इतक्या ऐनवेळी काय मनसुबा रचावा हे काही
केल्या कळत नव्हतं. शेवटी खलबतं झाली आणि विचाराअंती लोणावळ्यात भेटू आणि मग पुढचं
काय ते ठरवू असं ठरलं. मग काय लागलीच लोकल ट्रेनने लोणावळा गाठलं. ठरल्याप्रमाणे
महामंडळ स्थानकावर येऊन उभा राहिलो. अतृप्त आत्मा काही अजून आला नव्हता. पण
थोड्याच वेळात एक भुताटकीवजा पांढरी गाडी येताना दिसली आणि आमची जोडगोळी पुन्हा
एकदा एकत्र आली. आता सगळ्यात महत्त्वाचं काम. कावळ्यांची शांती करणं !!! पोटातल्या
भुकेच्या कावळ्यांबद्दल बोलतोय मी. मग जवळच एका खाणावळीकडे मोर्चा वळवला. जेवण
येईपर्यंत थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण आलं, १-२ घास पोटात गेले असतील तसा हर्षद
म्हणाला की आपण कपालेश्वरात जाऊन राहू. हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. साहजिकच
हे कुठे आलं? असा
माझा प्रश्न माझ्या चेहऱ्यावर न बोलता त्याला दिसला आणि तोच पुढे बोलता झाला की घाटामध्ये जुन्या रस्त्याने सूर्यास्त पॉईंटवरून उतरून पुढे गेलं की अमृतांजन पूलाजवळ एक कातळकडा
लागतो त्या कड्यातच एक कपारीवजा छोटी गुहा आहे. बस्स !!! त्यानं इतकं बोलायचा
अवकाश आणि ती जागा माझ्या डोळ्यासमोर आली. नुसतं इतकंच नाही तर अचानक माझा रॅम
कार्यक्षम होऊन माझा मेंदूरूपी हार्ड ड्राईव्ह पोखरू लागला आणि २-३ वर्षांपूर्वी
मी केलेल्या अमृतांजन पूलावरच्या संशोधनावर येऊन शांत झाला. आता त्या समोरच्या
बोलक्या आत्म्याला थांबवून माझ्या तोंडाचा पट्टा त्याचा मेंदू पोखरू लागला. मग काय? कसे लहानपणापासून मला प्रश्न पडले होते? कशी मला त्याची उत्तर मिळत गेली? हे सगळं जेवण होईपर्यंत मी त्याला
सांगून टाकलं. त्यालाही हे सगळं फारच भारी वाटलं आणि न बोलता ठरलंच मग काय करायचं
पुढे ते !! हे असं असतं प्रारब्ध !! जे आपल्या हातून होणार आहे ते चुकत नाहीच.
जेवण उरकलं आणि तातडीने कपालेश्वर गाठलं (चित्र क्रमांक ४ - चित्र सकाळी घेतलं आहे).
|
चित्र क्रमांक ४ |
अतिशय छोट्या अश्या ह्या कपारीत गुडघ्यावर बसूनच आत जावं लागतं. लगेच झोपण्याची
काही घाई नव्हती तेव्हा अंधारातच अमृतांजन पूलावर आलो. वरती आकाशात तारे आणि खाली दृतगती मार्गावर गाड्यांचे दिवे नक्षी रेखाटत होते. थोडावेळ ही नक्षी पाहण्यातच गेला आणि
मग त्या अंधारातच रिव्हर्सिंग स्टेशन कुठे असेल? मंकीहिल कडे जाणारी उतरंड (Ramp) उतरायला कुठून सुरुवात होते? असे सगळे अंदाज बंधू लागलो आणि सकाळी
उठून काय काय आणि कसं कसं पाहत जावं असं मोघम बोलणं झालं. झोप डोळ्यावर येऊ लागली
तसे कपारीत शिरलो. कपालेश्वराच्या छोट्याश्या तसबिरीपुढे तेवत असलेल्या पणतीचा
प्रकाश कपारीत जे छायाप्रकाशाचे खेळ करत होता ते पाहता पाहता झोप लागून गेली.
रविवार, २८-फेब्रुवारी-२०१६: सकाळी लवकरच जाग आली ते कोणाच्या तरी आवाज
देण्यामुळे. कपारीबाहेरच रस्त्यावर एक काका चहाची गाडी लावत होते त्यांचाच आवाज
होता. गाडी रस्त्यावर लावून ही कोण २ वेडी पोरं ह्या कपारीत झोपलीयेत असा प्रश्न
त्यांना पडणं ह्यात काही नवल नव्हतं. आम्ही मात्र चहासाठी लांब जावं लागणार नाही
ह्या कल्पनेनीच सुखावलो. कपारीतून बाहेर आलो. अंग मोकळं करून काकांशी गप्पा चालू
केल्या आणि त्यांना आमचा बेत सांगितला. सकाळचा पहिला चहा आणि वड्याचा पहिला घाणा
आमच्या नशिबात होता म्हणून आम्ही खुश आणि इतक्या सकाळी पाहिलं गिऱ्हाईक
भेटल्यामुळे काका खुश. दिवसाची अशी छान सुरुवात झाल्यावर पुढच्या शोधमोहिमेला
हुरूप आला. पुन्हा एकदा अमृतांजन पूलावर येऊन काही खाणाखूणा मिळतायेत का ते पाहू
लागलो. पण हे रिव्हर्सिंग स्टेशन बंद होऊन ९० वर्षे होत आली होती. १९२८-२९
सालाच्या आसपास हे रिव्हर्सिंग स्टेशन निष्क्रिय केले गेले होते. त्यामुळे फक्त काही
प्रकाशचित्रे घेऊन मंकीहिल कडे उतरणाऱ्या उतरंडीवर चालू लागलो. मुळात ही वाट
मंकीहिल कडे जात असेल ही कल्पनाच ह्या संशोधनाआधी नव्हती. त्यामुळे खूप उत्सुकता
होती. १५०-२०० मीटर अंतरावर एक फलक दिसला चित्र क्रमांक ५).
|
चित्र क्रमांक ५ |
पुढे चालू लागलो तसं
उजव्या बाजूला खंडाळ्याकडून येणाऱ्या तटबंधाचे (Embankment) अवशेष आजही तग धरून उभे असलेले दिसू लागले
(चित्र क्रमांक ६).
|
चित्र क्रमांक ६ |
ते पाहत अजून ३००-४०० मीटर पुढे गेलो आणि खरंच ही उतरंड मंकीहिलजवळ नवीन लोहमार्गापाशी जाऊन मिळाली (चित्र क्रमांक ७).
|
चित्र क्रमांक ७ |
ह्या चित्रात पाहिल्यास खंडाळ्याकडून येणारा सध्याचा नवीन लोहमार्ग डावीकडे दिसतो आणि रिव्हर्सिंग
स्टेशनकडून येणारा जुना मार्ग उजवीकडे दिसतो. आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक
बोगद्याच्या कमानीवर त्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे साल कोरलेले आहे. चित्र क्रमांक ७ मध्ये डावीकडे जो बोगदा दिसतोय त्यावर १९२९ असं साल आहे. (चित्र क्रमांक ८)
|
चित्र क्रमांक ८ |
म्हणजे ह्या
नवीन लोहमार्गावरच्या बोगद्याचं काम १९२९ साली पूर्ण होऊन रिव्हर्सिंग स्टेशन निष्क्रिय
केलेलं पटतं. ह्या बोगद्यातून आम्ही खंडाळ्याच्या दिशेने चालू लागलो. पुढे आल्यावर
लक्षात आलं की फक्त २ नाही तर खंडाळ्याकडे जाणारी तिसरीही एक लाईन डावीकडे आहे. (चित्र क्रमांक ९)
|
चित्र क्रमांक ९ |
ह्या बोगद्यावर मात्र १९८२ असं साल दिसलं. तेव्हा असं
लक्षात आलं की लोहमार्गाचे काम हे बऱ्याच टप्प्यात झालेले आहे. तिसरी लाईन ही फारच
नंतर म्हणजे ३५ वर्षांपूर्वी (अगदी माझ्या जन्माच्या वेळी) टाकण्यात आलेली आहे. ह्याच टप्प्यामधला अजून एक भाग म्हणजे मंकीहिल पासून कर्जत कडे जाताना समोर जो
डोंगर आहे त्याच्या २ बाजूंनी जाणारे २ वेगळे लोहमार्ग. डोंगराच्या उजवीकडून (ठाकूरवाडी
मार्गे) जाणारी जुनी लाईन हा मूळ जुन्या लोहमार्गाचा भाग आहे आणि डावीकडून (नागनाथ
मार्गे) जाणारी लाईन ही
अगदीच नवीन आहे. नागनाथ मार्गे जाणाऱ्या नवीन लाईनवरील बोगद्यांवरसुद्धा साल हे
शेवटचा आकडा स्पष्ट नसला तरी १९८० च्या आसपासचेच आहे (चित्र क्रमांक १० - गंभीरनाथ भटकंतीत घेतलेलं चित्र).
|
चित्र क्रमांक १० |
आता परत आल्यामार्गाने अमृतांजन पूलाकडे न जाता चित्र क्रमांक ७
मधील बोगद्यावर चढून गेलो आणि चित्र क्रमांक १ सारखं दृश्य कुठून दिसेल असं पाहू
लागलो चित्र मात्र घ्यायचं राहिलंच). पण एका वेगळ्या कोनातून एक छान तुलनात्मक चित्र मिळालं (चित्र क्रमांक ११ - हर्षदची कृपा).
|
चित्र क्रमांक ११ |
ह्यात कपालेश्वराचा कडा आणि
पूर्वीच्या लोहमार्गाऐवजी आताचा रस्ता धावताना दिसत आहे. ह्या जागेवरून अजून एक
गोष्ट पटली म्हणजे सध्याचा खंडाळ्याकडे जाणारा दृतगती मार्ग ज्या बोगद्यातून जातो तिथूनच पूर्वीचा लोहमार्ग जात होता.
बोगद्यामधून येणारी रेल्वे ही रिव्हर्सिंग स्टेशन वर नेली जात असे (चित्र क्रमांक
१२ आणि १३) आणि तिथून इंजिन उलट्या दिशेला लावून मंकीहिल मार्गावर नेली जात असे.
|
चित्र क्रमांक १२ |
|
चित्र क्रमांक १३ |
जवळपास निम्मं संशोधन इथे पूर्ण झालं होतं, आता खंडाळा स्टेशनातून बोगद्याकडे येणारी उतरंड शोधायची होती.
ब्रिटिशकालीन नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे ही उतरंड खंडाळा गावात जे तळे आहे
त्याच्या उजवीकडून (पश्चिमेला / मुंबईकडे तोंड करून उभे राहिल्यास) दृतगती मार्गावरील बोगद्याकडे जाते. तडक कपालेश्वराजवळ उतरून चहावाल्या काकांना रामराम करून
खंडाळा गावाकडे निघालो. तळ्यापाशी आलो. तळ्याच्या बाजूला आता खूप दाट वस्ती आहे त्यामुळे
नक्की लोहमार्ग कुठून होता ह्यावर काही अंदाज बांधता येत नव्हते. गाडी खंडाळा
स्टेशनात आणून लावली आणि स्टेशनवरून शोधमोहीम सुरु केली. एक अंदाज मात्र नक्की आला
होता की, खंडाळ्यात
असणाऱ्या ३ लाईन्स पैकी सगळ्यात उजवीकडची (मुंबईकडे तोंड करून उभे राहिल्यास) लाईन
ही मूळ जूनी लाईन आहे आणि साहजिकच त्याला जोडून असणारा फलाट हा जुना आहे.
डावीकडचा फलाट हा बराच नंतर बांधलेला आहे. स्टेशनपासून लोहमार्गावरून
मुंबईकडे चालत तळ्यापाशी आलो. ह्या एवढ्याच पट्ट्यामधून रेल्वे ही तळ्याच्या
उजवीकडे असलेल्या वस्तीच्या जागेतून उतरंडीला लागत असावी. ठळक खुणा मात्र काही
दिसल्या नाही. तळ्याजवळ काही वृद्ध लोक बसलेले होते. त्यांच्याकडून काही माहिती
मिळेल ह्या आशेने विचारणा केली तेव्हा त्यांना ह्या जुन्या वस्तीच्या जागेतून
जाणाऱ्या लाइनबद्दल काही माहित नव्हतं. तेही साहजिकच होतं, कारण ही लाईन १९२९ ला (ह्या लोकांच्या
जन्माआधीच)
बंद झाली होती. पण प्रयत्न अगदीच व्यर्थ गेले नव्हते, त्यांच्याकडून जी माहिती मिळाली तीही
तितकीच महत्त्वाची होती. पूर्वीपासून लोहमार्गावर काम करणाऱ्या लोकांनीच ही वस्ती
वसवली होती आणि आम्ही बोलत होतो ते लोक त्यांचीच पुढची पिढी होते. इतकंच नाही तर
सध्या खंडाळ्यातून मुंबईकडे बाहेर पडल्यावर ज्या बोगद्यामध्ये गाडी जाते तिथे
पूर्वी तळे होते (जे नकाशातही दिसते). १९२० साली मुंबई-पुणे लोहमार्गाच्या विद्युतीकरण करण्याचे ठरले.
ह्याच वेळी रिव्हर्सिंग स्टेशनला पर्याय म्हणून त्या तळ्यात बोगदे खोदून नवीन मार्ग टाकण्यात आला. त्यातले डावीकडचे बोगदे
हे १९२९ च्या आसपास खोदले गेले आणि चित्र क्रमांक ९ मध्ये जी लाईन आणि बोगदा आहे
त्यासाठी खंडाळ्यावरून मुंबईकडे जाताना जी तिसरी सगळ्यात नवीन (१९८२ सालची) लाईन टाकण्यात आली त्या
लाईनवर आणि बोगद्यांवर हे लोक स्वतः कामगार म्हणून राबलेले होते. हे कळल्यावर
मात्र आम्ही आपोआपच पायावर लोटांगण घातलं त्या लोकांच्या. प्रारब्धावरचा विश्वास
क्षणोक्षणी वाढतच चालला होता. उत्तरंच तशी मिळत चालली होती एका मागोमाग.
खंडाळ्यातून जुन्या उतरंडीवर जाणाऱ्या लाइनचं कोडं मात्र अजून अनुत्तरितच होतं.
शेवटचा पर्याय म्हणून आम्ही खंडाळा स्टेशनात काही माहिती मिळते का ते बघायला आलो.
आधी स्टेशन मास्टरला भेटलो. पण तो अगदीच नवखा तरुण होता त्यामुळे त्याला फार काही
माहिती नव्हती, पण
माणूस मात्र चांगला होता, त्याने
आम्हाला थांबायला सांगितलं आणि खंडाळा स्टेशनवर पूर्वीपासून काम करणाऱ्या एका
कर्मचाऱ्याला त्याने आवाज दिला. आमच्या प्रश्नांनी तो कर्मचारी मात्र तीनताड
उडाला. त्याच्या संपूर्ण कार्यकाळात कोणीच त्याला हे प्रश्न विचारले नव्हते आणि
आजच्या पिढीमधले आम्ही त्याला आज हे प्रश्न विचारत होतो. विशेष म्हणजे त्याने चक्क ह्या
जुन्या लाइनबद्दल ऐकलं होतं आणि आम्ही जो अंदाज बांधला होता त्याला त्याने पूर्ण
दुजोरा दिला. चित्र क्रमांक १४ सहज म्हणून देत आहे.
|
चित्र क्रमांक १४ |
बरं !! इतक्याने गोष्ट संपत
नाही. म्हणालो ना
प्रारब्धानं आज ठरवलंच होतं. त्या कर्मचाऱ्याने आमची अजून एका माणसाशी ओळख करून
दिली. हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल. फारुख (उर्फ बाबा) नावाचे हे पारशी
सद्गृहस्थ होते. १९४६ साली फारुखबाबांचे आई-वडील खंडाळ्यात स्थायिक झाले आणि १९४८
चा ह्या बाबांचा खंडाळ्यातलाच जन्म. सहसा हे बाबा कोणाला भेटत नाहीत, पण कोणा जुन्या कर्मचाऱ्याच्या
निरोपसमारंभासाठी नेमके त्याच दिवशी ते स्टेशनवर आले होते आणि त्या कर्मचाऱ्याने
आमची भेट घडवली. जेव्हा फारुखबाबांना आमच्या येण्याचे प्रयोजन कळाले तेव्हा
त्यांनाही कर्मचाऱ्याइतकेच आश्चर्य झाले. सत्तरीतल्या ह्या बाबांमध्ये अचानक एक
उत्साह आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवणाची वेळ झाली आहे तेव्हा तुम्ही
जेवून मग मला भेटा. आम्हाला तर आपल्याबरोबर आज हे काय घडतंय ते सुधरतंच नव्हतं.
लगोलग आम्ही त्या बाबांचा पत्ता घेऊन जेवायला बाहेर पडलो. जेवण केलं आणि लागलीच त्या
बाबांनी दिलेल्या पत्त्यावर हजर झालो. बाबांनी खंडाळ्यातल्या ज्या काही गोष्टी
आम्हाला दाखवल्या त्याचं वर्णन म्हणजे दुधात केशर एवढ्याच शब्दांत करता येईल. मूळ
विषयाला धरून नसल्यामुळे इथे मी फक्त जे पाहिलं त्याची यादी आणि काही चित्रं देतो
आहे.
१. ब्रिटिशकालीन १९ व्या शतकातली दगडी
बांधकामातली दफनभूमी (चित्र क्रमांक १५ - बाबा आणि आम्ही - मागे दफनभूमीचं दगडी
प्रवेशद्वार)
|
चित्र क्रमांक १५ |
२. ब्रिटिशकालीन सैनिकांच्या १९-२०
व्या शतकातील दगडी आणि लाकडी बराकी (चित्र क्रमांक १६)
|
चित्र क्रमांक १६ |
३. जवळच ब्रिटिशांनी दगडात खोदून
बांधलेला बदामाच्या आकाराचा जलतरण तलाव (चित्र क्रमांक १७)
|
चित्र क्रमांक १७ |
टीप:
- वरील तीनही जागांच्या खालून
रेल्वेमार्गावरचे किती नंबरचे बोगदे खोदलेले होते त्याचे क्रमांकही बाबांना नेमके माहित होते. आणि त्याचे पाषाणस्तंभही त्यांनी आम्हाला दाखवले.
- ह्या व्यतिरिक्त खंडाळ्यातली प्रसिद्ध चित्रीकरण स्थळे (शूटिंग पॉईंट्स) आणि खंडाळ्यात चित्रीकरण झालेले चित्रपट, गाणी आणि जाहिराती ह्याचीही माहिती
त्यांनी आम्हाला दिली.
- एक शेवटची गोष्ट फारुख बाबांबद्दल
म्हणजे ते एक उत्तम खेळाडू होते. शरीरसौष्ठव, बुद्धिबळ, कॅरम
वगैरे खेळांमध्ये त्यांनी बरीच मोठी कामगिरी केलेली होती.
फारुखबाबांचे आभार मानून आणि आज दिवसभरात जी काही माहिती पदरात पडली त्याने मनोमन सुखावलेलो आम्ही संध्याकाळी आपापल्या घरी परतलो.
इतकं सगळं संशोधन... इतका सगळा प्रवास... हे ज्या कुतूहलातून मी अनुभवलं. त्याचा
एक महत्त्वाचा भाग - अमृतांजन पूल (रिव्हर्सिंग स्टेशन) आज इतिहासजमा झालाय.
हे टाळता आलं असतं... आपल्या रेल्वेचा
हा वारसा आपल्याला जपता आला असता... तर खूप बरं वाटलं असतं. पण असं होऊ नये आणि
आपण त्यासाठी काही करू न शकणे हे मात्र मनाला शेवटपर्यंत टोचणी देत राहील.
ह्या ठिकाणाशी किंवा वास्तूशी
बालपणापासून जोडलेल्या इतक्या आठवणी आज एका क्षणात इतिहासजमा झाल्या. एकप्रकारे
बालपण संपल्याची चाहूलच वाटते मला ही. पण शेवटी निसर्गनियमच तो, प्रत्येक गोष्टीला अंत हा असणारच. "कालाय तस्मै नमः" असं थोर लोक म्हणून गेलेच आहेत. एक दिवस मलाही काळाच्या पडद्याआड जावंच लागणारे. पण ती वेळ येईपर्यंत, ह्या वास्तूच्या स्मृती मात्र माझ्या
मनात शेवटपर्यंत राहतील !!
अत्यंत महत्त्वाचं असं काही:
माझ्या मराठी बांधवांनो... चला...
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
- हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
- अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
- आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.
मस्त पश्या.. प्रस्तावना भन्नाट...
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा !!
हटवाVery very informative, I could imagin the scenario while reading ur sentences,
उत्तर द्याहटवाVery well described
Thank you very much for sharing this
One thing I would also share about rhis bridge
Jyoti got her job offer when we were around that historical bridge
Thank you so much !! Nice to know that you also have been to this place !!
हटवाAmrutanjan pulala kharya arthan itihasacch, wicharanch ichhashactich amrut pajun sajiw kelay
उत्तर द्याहटवासुंदर अभिप्राय !! मनापासून धन्यवाद !!
हटवा