खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...

।। खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...।।

दिनांक: ३० डिसेम्बर २०१७ ते १ जानेवारी २०१८
भटकंती: जांभवली ते भीमाशंकर 
भटकर्स: टीम झेनिथ ओडिसीज्

आयुष्याची ३६ वर्षे उलटून गेल्यावर ह्या दोन देवतांचा दूत बनून जाण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. तीन दिवसांच्या ह्या प्रवासाचा थोडक्यात वृत्तांत देण्याचा हा प्रयत्न.

दिनांक ३० डिसेम्बर २०१७ - जांभवली ते तळपेवाडी (१२ किमी डोंगरयात्रा आणि १८ किमी गाडी प्रवास)

सकाळी ७.३० ला कामशेत स्टेशनात आमचा जत्था जमला. पुरेसं उदरभरण झाल्यावर जांभवली फाट्यावर आलो. एका जीपने आम्हाला जांभवलीमधे पोहचतं केलं तेव्हा ९.३० वाजले होते. उतरून तडक कोंडेश्वराकडे चालत निघालो. कोंडेश्वरावरून दिसणाऱ्या ढाकच्या कातळाने सहाव्यांदा त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं.
कोंडेश्वराला नमन करून खलिता हाती घेतला आणि प्रयाण केले तेव्हा १० वाजले होते.  सह्याद्रीच्या भरभक्कम कण्याने आमचं वजन पेललं. ढाकच्या वाटेवरचा पहिला डोंगर चढलो. पुढे त्याच वाटेने थोडंसं जंगलाकडे उतरल्यावर भीमाशंकराकडे जाणारा फाटा दृष्टीक्षेपात आला.
इथून पुढची वाट माझ्यासाठी नवी होती. ही वाट आम्हाला नेणार होती कुसूर पठारावर. चढाईला सुरुवात झाली. छातीवरचा चढ चढून ११.३० ला कुसूर पठारावर पाऊल टाकलं.
वाटेत ढाक आणि कळकराय सुळक्याचे एका वेगळ्या कोनातून झालेले दर्शन सुखावून गेले. अजगरासारखं पसरलेलं अदमासे ५ किमी लांबीचं कुसूर पठार तुडवत आणि पुढे ३ किमी चा डोंगर उतरून आम्हाला आंदरमावळातलं कुसूर गाठायचं होतं. वाटेत एका दगडावर पंजाकृती पाहायला मिळाल्या. फोटो काढून पुढची वाट चालू लागलो. दीड तासात म्हणजे दुपारी साधारण १ वाजता धनगरवाड्यात येऊन पोहचलो. एका वृद्ध जोडप्याने आपुलकीने त्यांच्या खोपट्यात बसायला जागा दिली. दुपारची न्याहारी उरकली. त्या घरातल्या मातेने ताकाच्या रूपात तिचं प्रेम आणि आशिर्वाद दिले. दीडच्या सुमारास त्या जोडप्याचा निरोप घेऊन कुसूर पठार उतरायला सुरुवात केली.
पठारावरून आंदर खोऱ्यात उतरत ३ वाजत असताना कुसूर गाव गाठलं. उतरताना ढाकने अजून एका कोनातून दर्शन देऊन आम्हाला निरोप दिला. कुसूर गावात सुदामा आमची वाटच पाहत होता. त्याने त्याच्या जीपेतून आम्हाला १८ किमी वर असलेल्या तळपेवाडीत पोहचवलं. ४ वाजले होते. एका शाळेच्या ओसरीचा आसरा घेतला.
चहा-फराळ झाला. वाडीतील पोरांशी खेळ आणि गप्पा असं सगळं पार पडलं.

अंधार पडू लागला, चुलीवर भात रांधून पोटात ढकलला आणि झोपी गेलो.

दिनांक ३१ डिसेंबर २०१७ - तळपेवाडी ते येळवली (२० किमी डोंगरयात्रा)

आज जवळपास २० किमी अंतर कापायचं होतं. सकाळी उठून नित्यकर्मे, चहा-फराळादि उरकून वाडीकरांचा निरोप घेऊन ९.४५ च्या सुमारास वांद्रे खिंडीची वाट धरली.
तोरणे गावाकडे जाणारं एक कुटुंब वांद्रे खिंडीपर्यंत सोबतीला होतं.
खिंडीजवळ पाण्याची पाच खोदीव टाकी पाहायला मिळाली. खिंडीनंतर त्या कुंटुंबाचे आभार मानून पधारवाडीला पोहचलो तेव्हा दुपारचे १२.३० वाजले होते. शाळेत बसून न्याहारी केली. १ वाजता पुढच्या  वाटेला लागलो. अजून जवळपास १३ किमी अंतर कापायचं बाकी होतं. अर्ध्या तासाचा डोंगर चढून वाटेला लागलो. आता फार चढउतार नव्हता, त्यामुळे पुरेसा वेग मिळत होता. पश्चिमेला सह्याद्रीच्या पोटामधून कोथळीगडानं हळूच डोकं बाहेर काढलं आणि आमचं राम-राम शाम-शाम झालं.
समोर दिसणाऱ्या पदरगडानं जुन्या खांडस-भीमाशंकर ट्रेक च्या आठवणी जाग्या केल्या.
आज बरोबर अकरा वर्षांनी भीमाशंकराची डोंगरयात्रा घडत होती. ह्यावेळी फक्त वाट वेगळी आणि जास्त खडतर होती. खेतोबा
, वाजंत्री घाट, हुगे नाळ असं सगळं डाव्या बाजूला मागे टाकत आम्ही चालत राहिलो. समोर भीमाशंकराचा डोंगर आमची वाट पाहताना दिसत होता. एकामागे एक अशी ३ जंगलं आणि पठारं पार करत संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास आम्ही कमळजाईच्या देवळाजवळ पोहचलो.
देवीला नमस्कार करून भोरगिरीच्या वाटेवर असण्याऱ्या येळवली गावात आलो. आजची २० किमी ची पदयात्रा पूर्ण झाली होती. बाणेरे कुटुंबाच्या ओसरीमधे आश्रय मिळाला. घरातल्या मातेने चहाने स्वागत केलं. जवळील शिधा त्या मातेच्या हाती देऊन आम्ही चुलीजवळ शेकत बसलो. चुलीचा शेक आणि प्रेमळ बाणेरे जोडप्याशी झालेल्या गप्पांनी श्रमपरिहार झाला. आम्ही दिलेल्या शिध्यात स्वतःकडचा शिधा मिसळून त्या अन्नपूर्णेने आम्हाला अक्षरशः पंचपक्वान्नाचं जेवण जेवू घातलं. आयतं जेवण जेऊन ओसरीतच पथाऱ्या पसरून आडवे झालो. शुक्ल चतुर्दशीच्या लख्ख चांदण्यानं सभोवार उजळून निघालं होतं. झोप लागायला काही क्षणांचाच अवधी लागला. आजपर्यंत कधीच इतकी छान वर्षअखेर साजरी झाली नव्हती.


दिनांक १ जानेवारी २०१८ - येळवली ते भीमाशंकर (६ किमी डोंगरयात्रा)

पहाटे जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटानेच. पूर्व क्षितिजावर तांबूस रेषा उमटत होती. क्षितिजावरची ती रंगपंचमी पाहत किती वेळ तसाच पहुडलो होतो. भानावर आलो आणि उठून आवरलं. तोपर्यंत त्या मातेने चहा समोर ठेवला. चहा-फराळ उरकून निघण्याची तयारी केली.सकाळी ८.३० ला बाणेरे कुटुंबाला धन्यवाद देत येळवलीचा निरोप घेतला. आज शेवटचं ६ किमी अंतर कापून भीमाशंकरास पोहचायचं होतं. पुन्हा एकदा कमळजाईपाशी येऊन तिला नमून भीमाशंकरची वाट धरली.
पूर्वेकडे भोरगिरी गाव कोवळ्या किरणांत शेकत बसलं होतं.
चालणं चालूच ठेवलं. भीमा नदी ओलांडताना स्वर्गीय नर्तकाच्या (Paradise Flycatcher Male) जलक्रीडांनी खिळवून ठेवलं.
आता भीमाशंकराचा डोंगर समोर आला. तो अर्धा चढून गुप्त भीमाशंकराकडून वर्दी पोहचवली आणि भीमाशंकराच्या दरबाराकडे मार्गस्थ झालो. पुढे उरलेला अर्धा डोंगर चढून आल्यावर ते सुबक देऊळ समोर आलं. प्रांगणात प्रवेश केला.


कोंडेश्वराचा खलिता भीमाशंकरास पावता झाला.
दुपारचे जेवण उरकून ट्रेकची उजळणी करत मंचर मार्गे घर गाठलं.

अत्यंत महत्त्वाचं असं काही:

माझ्या मराठी बांधवांनो... चला...
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
  • हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
  • अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
  • आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संपले बालपण माझे

सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

ओढाळ वासरू रानी आले फिरू

एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

दोन दिवस सहा किल्ले

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!