दोन दिवस सहा किल्ले
अवचितगड, घोसाळगड, तळागड, पद्मदुर्ग, सामराजगड, बिरवाडी !!!
दिनांक: २ व
३
एप्रिल
२०१६:
भटकंती: अवचितगड, घोसाळगड,
तळगड,
पद्मदूर्ग,
सामराजगड,
बिरवाडी.
भटकर्स: रॉक हार्ट्स संघ - हर्षद,
प्रसाद,
महेश,
जयवंत,
अर्चनाताई आणि अश्विनी.
आग पाखडणाऱ्या भयंकर उन्हाळ्यात ऐन कोकणातील ह्या भटकंतीची योजना करणं म्हणजे आमच्यातील सोशिकपणा आणि चिकाटी यांची निव्वळ परीक्षा पाहण्यासारखंच होतं.
ही योजना करणं म्हणजे मूर्खपणा असेलही पण आम्हाला हा करून बघायचाच होता. मोहीम आखली गेली.
५ किल्ले (अवचित, घोसाळगड,
तळागड,
पद्मदूर्ग,
बिरवाडीचा किल्ला)
आणि एक लेणीसमुह
(कुडे)
अशी मूळ मोहीम होती.
दिनांक २ एप्रिल २०१६:
ठरल्याप्रमाणे मी,
जयवंत आणि अर्चनाताई पहाटे (खरंतर रात्री) २ वाजता माझ्या टाटा निर्मित रणगाड्याने (कौतुक आहे मला माझ्या ह्या दर ट्रेकला साथ देणाऱ्या रणगाड्याचं) प्रस्थान केले. पहाटे ३:३० ला खोपोली जवळील शिळफाटा येथे पोहचलो. रॉक हार्ट्स संघाचा म्होरक्या (माझा बंधू) हर्षद आमची वाट पहातच होता.
सोबत हरहुन्नरी महेश
(कमालीची एनर्जी आहे ह्या मर्दामध्ये) आणि अश्विनी
(एवढासा पण कमालीची ताकद असणारा जीव) पण होते.
पुढचा प्रवास सुरु झाला.
पाली मार्गे रोह्याचा रस्ता आमच्या गाड्या धावू लागल्या. बल्लाळेश्वर बाप्पास हमरस्त्यावरूनच दंडवत घालून वाकण नाक्यावर पोहचलो.
पहाटेचे ४:३० वाजले होते.
पोटातून आवाज आला - "चहा पाहिजे रे आता."
नाक्यावरच मस्त चहा घेतला.
सोबतीला हर्षद-प्रसाद
(Krack-Jack) बिस्कीट होतंच.
आता अवचितगड पायथा
(पिंगळसई)
फक्त १८ किमी लांब होता.
निघालो आणि तडक पिंगळसई गाठलं.
पहाटेचे ५:३० वाजले होते.
मनुष्य,
प्राणी,
पक्षी,
वृक्ष यांना नुकतीच जागल येत होती. वातावरणात प्रसन्नता होती.
न्याहारीचे सामान आणि पाणी सॅक मध्ये भरलं. गावातल्या सुबक मंदिरात बसलेल्या गजाननाला वंदून किल्ल्याची वाट धरली. (चित्र १ व २)
चित्र १ - पिंगळसई गावातल्या गणपती मंदिरासमोर असलेली दीपमाळ आणि त्यावरची दिपज्योत होऊन बसलेला चांदोमामा |
चित्र २ - पहाटेच्या अंधारात अवचितगड चढाईला सुरुवात |
१ किमी डोंगरकडेने चालल्यानंतर मूळ वाट सापडली.
लांबवर दिसणाऱ्या अवचित गडाच्या दक्षिण बुरुजावरच्या भगव्याने शक्ती दिली.
तासाभरातच खिंड गाठली. थोडा आराम आणि ऊर्जादायक पेय (टॅंग) प्राशन करून पुढच्या वाटेस लागलो. "ओम नमः शिवाय" अशी महेशने दिलेली 'ढेलकार' (ललकारशी साधर्म्य) विशेष हसवून गेली.
खिंडीतून २०-२५ मिनिटे चढून गेल्यावर गडाचा दरवाजा स्वागतासाठी सामोरा आला (चित्र ३). नित्य अल्काबादि सोपस्कर झाल्यावर पूर्व तटाने गडभ्रमंतीस सुरुवात केली (चित्र ४).
चित्र ३ - अवचितगडाचा मुख्य दरवाजा |
चित्र ४ - पूर्वतटावर सूर्यनारायणाने आम्हाला थोडावेळ असं खिळवून ठेवलं |
तटावरच्या किरणाभिषेकात न्हाऊन तृप्त होत दक्षिणेकडे चालत राहिलो आणि थोड्याच वेळात दक्षिण बुरुजाच्या पायथ्याशी येऊन दाखल झालो. दक्षिण बुरुजाखालचा लाकडी पूल विशेष देखणा आहे. (चित्र ५)
चित्र ५ - दक्षिण बुरुजाखालचा लाकडी पूल |
पूलापासून पुन्हा पश्चिम तटाने चढ चढून किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यातून प्रवेश केला. इथूनच दक्षिण बुरुजावर जायला पायऱ्यांचा मार्ग आहे. ह्या बुरुजापाशी असलेला १८ व्या शतकातला एक शिलालेख, दगडावर कोरलेली एक शस्त्रधारी मूर्ती पाहून आणि बुरुजावरील भगव्याला नमून पुन्हा पश्चिम तटाने बालेकिल्ल्याकडे चालू लागलो (चित्र ६).
चित्र ६ - बालेकिल्ल्याचा अर्धबुजला दरवाजा |
अर्धबुजलेल्या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करून ७ टाक्यांच्या समूहापाशी आलो तोच सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. लगेच शिदोऱ्या सोडून पौष्टिक न्याहारीवर सर्वांनी ताव मारला.
न्याहारीच्या कृतीसाठी मिळालेली दाद सुखाऊन गेली (चित्र ७).
चित्र ७ - दूर्गभोजन |
थोडा पोटोबा झाल्यानंतर बालेकिल्ल्ला आणि उर्वरित गडभ्रमंतीस निघालो. टाक्यांच्या भिंतीवर असणारी बापूजी किंवा बाजी पासलकरांची समजली जाणारी घुमटी पाहून टाक्यांच्याच थोडंसं वरच्या भागात असणारं बालेकिल्ल्यावरचं शिवालय आणि त्यासमोरचं प्रशस्त असं अदमासे ४० मीटर्स व्यासाचं द्वादशकोनी बांधीव तळं पाहिलं (चित्र ८).
चित्र ८ - प्रशस्त द्वादशकोनी बांधीव तळं |
बालेकिल्ल्याच्या उत्तरदरवाजाने बाहेर पडून किल्ल्याच्या उत्तर टोकावरील बुरुजावर आलो. इथेही भगवा डौलाने फडकत होता (चित्र ९).
चित्र ९ - केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारिला |
तो केशरी रंग पाहून "केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला" हे गीत स्मरलं नसतं तर नवलच. सवयीप्रमाणे पूर्ण आवेशात ते गीत गायलो आणि ९:३० वाजेपर्यंत पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी आलो. आल्या वाटेने गड उतरून तासाभरात म्हणजेच १०:३० ला पिंगळसई गाठलं. रिकाम्या झालेल्या पाणपिशव्या गावातल्या एका विहिरीवर भरून घेतल्या आणि तिथून लगेच निघून रोह्यामध्ये आलो. रोह्यामध्ये हर्षदची नादुरुस्त झालेली चर्वण व्यवस्था दुरुस्त करून घेतली
(दाताचे काम). आता गडी खेकडे तोडायला तयार झाला होता. त्या आनंदातच घोसाळगडाचा पायथा गाठला.
घोसाळे गावात पोहचेपर्यंत दुपारचे १२ वाजले होते. ऊन मी म्हणत असलं तरी अंगात त्राण अजून बरेच शिल्लक होते आणि घोसाळगडही तसा उंचीला थोडकाच. मग काय... हर हर महादेव ची गर्जना केली आणि चढाईला सुरुवात केली. १५-२० मिनिटातच गडाचा दरवाजा गाठला. तटबंदीवर वेड्यावाकड्या पसरलेल्या मुळ्यांवर काही माकडचाळे केले (चित्र १०).
चित्र १० - पूर्वजांना स्मरून तटावर केलेली चढाई |
पश्चिम तटाने किल्ला पहात दक्षिण बुरुजापर्यंत जाऊन आलो. येताना वाटेतून किल्ल्याच्या उत्तरेकडील माचीचं सुंदर दृश्य टिपलं (चित्र ११).
चित्र ११ - घोसाळगडाची देखणी माची |
माची फिरून पुन्हा दरवाज्यापाशी आलो आणि १० मिनिटात किल्ला उतरून घोसाळे गावात आलो. आता मात्र ऊन्हाचा कडाका असह्य वाढला होता. घोसाळे गावातच एक घरगुती दुकान शोधलं. शीतपेये रिचवून दुपारी २ वाजता तळा गावाकडे कूच केलं.
तळा ही पूर्वीपासूनच बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. सातवाहन काळात समुद्रमार्गे राजपुरी बंदरात येणारा माल येथूनच घाटावर जात असे.
त्या मार्गाचे रक्षण करणारा तळगड आता पहायचा होता. किल्ला अगदी गावाच्या मागेच एखाद्या रक्षकासारखा उभा होता, पण ऊन मी म्हणत होतं, दुपारचे ३ वाजले होते आणि पोटातूनही भुकेचे स्वर ऐकू येत होते. तळा गावातच एक
'हाटील'
गाठलं. हेल्दी डाएट वगैरे सगळं विसरून मिसळ, वडा,
भजी...
वाह !!!
यावर मनसोक्त ताव मारला आणि स्वतःचा अजगर करून घेतला. रात्री २ पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे १३ तास पुरेसे श्रम झाले होते. वामकुक्षीची गरज होती.
वाटेवरच्या एका मारुती मंदिरात पहुडलो.
४:१५ वाजता पुन्हा एकदा शक्ती एकवटून किल्ला चढण्यास सुरुवात केली. किल्ल्याला ३ तट आहेत आणि वाट हि खूप फिरून फिरून वर पोहचवते. वाटेतून तळा गावाचं सुंदर दर्शन घडतं (चित्र १२).
चित्र १२ - तळा गाव |
एका मागे एक असे ३ तट पार करत माथ्यावर पोहचलो.
चांगल्या अवस्थेतील तट-बुरुज, इमारतींचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून समाधान वाटलं.
पश्चिम बुरुजावर येऊन बसलो. पश्चिमेच्या गार वाऱ्याने अनपेक्षित साथ दिली (चित्र १३).
चित्र १३ - पश्चिमेचा गार वारा.. हास्यसुमनांच्या बरसती धारा... |
त्याचा आस्वाद घेऊन आणि आभार मानून उतरणीला लागलो. संध्याकाळी ६ वाजता तळा गावात पोहचलो.
आता ऊजेड असेपर्यंत कुडे लेणीला पोहचणे अशक्य होते. तेव्हा मुरुड (जंजिरा) ला जाण्याचा निर्णय घेतला. अति खराब रस्त्याने ४० किमी अंतर पार करून संध्याकाळी ७:३० वाजता मुरुडमध्ये पोहचलो. वाटेत राजपुरीवरून जंजिरा किल्ल्याचं अंधारातलं महाकाय रूप धडकी भरवून गेलं. मुरुडमध्ये येऊन मुक्कामाची व्यवस्था केली
(देवकीनंदन लॉज). लागलीच उद्या सकाळच्या पद्मदूर्ग मोहिमेसाठी नौका ठरवली. लॉजमध्ये थोडं ताजेतवाने होऊन पाटील खाणावळीत मांसाहारी जेवणावर यथेच्छ ताव मारला. थोडा वेळ मुरुड बीचवर शतपावली करता करता नक्षत्र दर्शन घेतलं. शहरांमधून सहजासहजी न दिसणारं पुष्य नक्षत्र इथून मात्र छान दिसलं. भटकंतीचा पहिला दिवस संपला. लॉजमध्ये येऊन पथाऱ्या पसरून निद्रादेवीच्या आराधनेला लागलो.
दिनांक ३ एप्रिल २०१६:
पहाटेच उठून मी आणि महेश ठरवल्याप्रमाणे समुद्रस्नानास गेलो. आहाहा !! केवळ सुख !! ८ वाजेपर्यंत सर्वजण आवरून आणि थोडासा पोटोबा करून तयार झालो. आजचा दिवस विशेष होता. कारणच तसं होतं त्याला, आज आम्ही शिवाजी महाराज,
संभाजी महाराज आणि लायपाटील यांच्या स्मृती जागवणारा कासा किल्ला उर्फ पद्मदूर्ग बघणार होतो.
कोळीवाड्यावर पोहचलो. नौकावाल्यांशी संपर्क केला. १५-२० मिनिटात गडी पावते झाले.
९ वाजता लाटांवरचा थरारक प्रवास सुरु झाला (चित्र १४).
चित्र १४ - पद्मदूर्गाच्या कुशीत शिरण्यास आतुर |
२० मिनिटातच साधारण २.५ कि मी चा सागरी प्रवास करून नौका पद्मदूर्गाच्या खडकाळ किनाऱ्याजवळ पोहचली. आता उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर नौका पद्मदूर्गाला भिडली आणि आम्ही त्याच्या कडेवर, आईची ओढ लागलेल्या एखाद्या लेकराप्रमाणे झेपावलो. सगळ्यात पहिली जी गोष्ट आजपर्यंत खूप वेळा ऐकली होती आणि पोहचताक्षणी नजरेत भरली ती म्हणजे किल्ल्याच्या दरवाजाजवळील दर्शनी बुरुज, बुरुज व तटातील चिऱ्यांमधले दरजे भरण्यासाठी वापरलेले चुन्याचे मिश्रण, तटाचे चिरे झिजलेत पण चुना मात्र अजूनही शाबूत आहे (चित्र १५ व १६).
चित्र १५ - दर्शनी बुरुज |
चित्र १६ - स्थापत्यकलेचा अविष्कार |
यावर संशोधन देखील केले जाते. पुढचा तास-दीड तास आम्ही केवळ भारावलेल्या अवस्थेत किल्ला पाहत होतो. मूळ किल्ल्यापासून काही अंतरावर बांधून काढलेली पश्चिमेकडील संरक्षकभिंत, दरवाजे, ६ महाकाय बुरुज,
जंघ्या,
४० तोफा, इमारतींचे अवशेष, पाण्याची तळी आणि अंगावर शहारे आणणारा इतिहास ह्या सगळ्या विश्वात आम्ही मंत्रमुग्ध होऊन न्हाऊन निघत होतो (चित्र १७).
चित्र १७ - इतिहासाचा साक्षीदार - पद्मदूर्ग उर्फ कासा किल्ला |
मन भरून सगळं पाहून झाल्यावर थोडासा पोटोबा करून पुन्हा एकदा लाटांवरचा थरार अनुभवत मुरुडास परतलो (११वाजता) ते एक नवीन किल्ला पाहण्याचा निश्चय करूनच.
तो किल्ला म्हणजे मुरुड जवळच्या एकदरा गावामागील सामराजगड (चित्र १८).
चित्र १८ - नावाडी दादाचे आभार |
तत्पूर्वी एक वेगळाच मनसुबा रचला गेला.
त्याप्रमाणे बाजारात जाऊन हरवला (माश्याचे नाव), चिम्बोऱ्या आणि कोंबडी असा ऐवज घेतला आणि सौ गीता भगत या कोळी गृहीणीकडे तो शिजवण्यासाठी सोपवून सामराजगडाची वाट विचारत दुपारी १२ वाजता एकदरा गावात येऊन पोहचलो.
गावात कोणालाही सामराजगड माहित नव्हता.
ह्यालाच म्हणतात दिव्याच्या बुडाशी अंधार. शेवटी एका मुलाकडून मिळालेल्या साधारण माहितीचा मागमूस घेत आणि अंदाज लावत एक टेकडी गाठली आणि सामराजगडाची तटबंदी आम्हाला पाहून थोड्यावेळासाठी का होईना पण समाधान पावली (चित्र १९).
चित्र १९ - सामराजगडाच्या तटबंदीवरुन मुरुड गावाचे अवलोकन |
वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांसारखी अवस्था आहे आज ह्या किल्ल्याची.
पडक्या तटबंदीवजा दगडांच्या राशींशिवाय तिथे काहीच शिल्लक नव्हतं. होता तो फक्त एका लढाईचा इतिहास. तिथून झालेल्या जंजिरा आणि पद्मदूर्ग दर्शनाने मात्र त्या किल्ल्याचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व व्यवस्थित पटवून दिलं. सामराजगडाचा निरोप घेतला आणि भगत मावशीचं घर गाठेपर्यंत दुपारचा १ वाजला.
स्वयंपाकघरातून येणाऱ्या खमंग वासानं भुकेत भर घातली होती आणि थोड्याच वेळात सगळे समाधीस्थ झाले.
फक्त ताटातले जेवण आणि ते जेवणारी व्यक्ती यांच्यातच काय ते नातं जडलं होतं.
बाकी सगळ्या जगाचा विसरच पडला होता जणू.
अशा त्या समाधीतून अर्ध्या तासाने सर्वजण बाहेर पडलो आणि
'अन्नदाता सुखी भव' म्हणत भगत मावशींचा निरोप घेतला (चित्र २०).
चित्र २० - समाधी लागण्याच्या आधी घेतलेले चित्र |
आता बिरवाडीचा किल्ला आमची वाट बघत होता. दुपारी ३ वाजता मुरुड सोडलं आणि फणसाड अभयारण्यातील निर्जन व झाडीभरल्या रस्त्याने चणेरे गाव गाठून गाडी बिरवाडी किल्ल्याच्या दिशेला वळवली. ४ वाजता पायथा गाठला.
पायथ्याशी असलेल्या वडांवर सूरपारंब्या खेळून आणि महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून व अल्काब पुकारून गड चढण्यास सुरुवात केली. मुख्य वाटेने न जाता आम्ही चोरवाटेने २०-२५ मिनिटात किल्ला सर केला.
वाटेत प्रस्तरारोहणाचा अनुभव कौशल्य पाहणारा होता. पुन्हा एकदा किल्ल्यावर
'शिवकल्याणराजा'
मधील काही संवाद व गाणी गायलो आणि संध्याकाळच्या वाऱ्यात फडफडणाऱ्या भगव्याभोवती कडं करून
'वन्दे मातरम' म्हणून समारोप केला.
मूळ वाटेवरून उतरताना उत्तम स्थितीतील दरवाजा पाहून बरं वाटलं.
करवंदादि रानमेवाही आता १-२ आठवड्यातच पिकून पोटात जाण्याच्या तयारीला लागला आहे. (चित्र टिपण्याचा उत्साह मात्र इथे येईपर्यंत संपला होता).
संध्याकाळी ६:३० वाजता बिरवाडीचा निरोप घेऊन रोहा वाकण मार्गे पुन्हा एकदा शिळफाटा गाठायला संध्याकाळचे ९ वाजले. इतकं सगळं झाल्यावर आता एकच पाहिजे होतं ते म्हणजे रमाकांतचा वडापाव आणि कोथिंबीरवडी आणि नशिबानं ते सुद्धा मिळून गेलं त्यावर ताव मारत जमाखर्चाचे हिशोब मिटवून बदलापूरकरांचा निरोप घेऊन रात्री १०:१५ वाजता चिंचवडच्या वाटेला लागलो.
रात्री ११:३० वाजता घरी पोहचून दोन दिवसाच्या ट्रेकची उजळणी करत शांत झोपी गेलो.
अविस्मरणीय ट्रेक
!!!
अत्यंत महत्त्वाचं असं काही:
माझ्या मराठी बांधवांनो... चला...
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
- हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
- अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
- आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा