एक पठडीबाहेरचं प्रवासवर्णन

तसं पाहिलं तर ह्या विषयावर काही लिहावं, असा काही माझा विचार नव्हता. नेहमीप्रमाणे मी, माझा एक सायकलानुभवच लिहायला बसलो होतो पण विचारांनी, मनाचा आणि हातांचा ताबा घेतला आणि सायकालानुभव बाजूला ठेऊन कागदावर वेगळीच आणि अनपेक्षित अक्षरं उमटायला लागली. मग मीही स्वतःला विचारांच्या आधीन केलं आणि विचार हातांकडून काय लिहून घेतात ते निमूटपणे पाहत राहिलो. त्यातूनच ह्या एका वेगळ्याच प्रवासवर्णनाचा जन्म झाला.

मागे एकदा, माझ्या एका लिखाणात मी म्हणालो होतो की, चराचर ह्या संकल्पनेत स्थान असलेल्या कुठल्याही अचल गोष्टीला "निर्जीव" म्हणणं, मला तरी रुचत नाही. अगदी बालपणापासून ते आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली कुठलीही अचल गोष्ट (ठिकाण / निसर्गाचा घटक / वस्तू इ.ही "सजीव" आहे असं मी मानत आलो आहे. त्यातल्याच काही गोष्टींशी तर अगदी (सजीवांपेक्षा काकणभर जास्तच) आपुलकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे "सायकल". सायकलला नुसतं "सायकल" असं म्हणण्यात, मला एक प्रकारचा निर्जीवपणा जाणवतो. मग अर्थातच, सायकलला काही तरी नाव असावं आणि त्याच नावानं तिला संबोधावं हे ठरलं.

गोंधळात पडलात ना सुरुवात वाचून? ह्यात प्रवासवर्णन कुठे आहे वगैरे? सांगणार... सगळं नीट समजावून सांगणार !! प्रवास म्हणजे काय? तर एका ठिकाणावरून ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी जाणे. आता प्रवास फक्त मनुष्य किंवा प्राणीच करतात का? तर नाही !! साऱ्या विश्वाचा कुठे ना कुठे एक प्रवासच सुरु आहे. आकाशगंगेचा अनंतातला, पृथ्वीचा आणि इतर ग्रहगोलांचा सूर्याभोवती, जीवनाचा मरणाकडे, साधू-संतांचा विश्वकल्याणाकडून ईश्वरप्राप्तीकडे, बद्धांचा मुमुक्षु होण्याकडे, मुमुक्षुंचा मोक्षप्राप्तीकडे, एखाद्या छोट्या रोपट्याचा मोठाल्लं झाड होण्याकडे, असे कितीतरी प्रवास सांगता येतील. पण हे सगळं बाजूला ठेवून आपण फक्त मानवापुरतंच बोलू. मानवाचं फक्त शरीर एका ठिकाणाहून उठून दुसऱ्या ठिकाणी जाणं, ही एकच गोष्ट म्हणजे काही प्रवास नाही. तर मानवाबरोबरच त्याचं मन, त्याचे विचार, त्याची स्वप्न, त्याच्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा हे सगळे घटकही अखंड प्रवासच करत असतात. असाच माझा हा एक वैचारिक प्रवास आणि त्याचं केलेलं वर्णन म्हणून मी ह्याला प्रवासवर्णन असंच म्हणतोय. हा वैचारिक प्रवास आहे एका नावामागच्या कथेचा आणि काही आठवणींचा.

तर, बरेच दिवस झाले, एका भुंग्याने डोक्याचा पार भुगा केला होता की, "सायकलला नाव द्यावं तरी काय?" ओघानेच मग आधी नामकरणाच्या अटी ठरल्या. माझ्याच अटी त्या, असून तरी काय वेगळ्या असणार? पहिली अट म्हणजे अर्थातच, नाव हे मराठी असावं, दुसरं म्हणजे साहजिकच त्यातून सायकलबद्दलचा जिव्हाळा प्रकट व्हावा आणि तिसरं म्हणजे त्या नावाचं सह्याद्रीशीही नातं असावं. आता अटींना अनुसरून नावांच्या यादीला सुरुवात झाली. यादी करणं हे अजिबात अवघड नव्हतं. गेली दोन दशकं जी नावं मनात रुंजी घालत आली होती, ती एव्हाना डोक्यात "मी.. मी.." करून उड्या मारायला लागली. कोण कोण होतं मग ह्यात?

अग्रमान होता मावळांतून वाहण्याऱ्या नद्यांचा... काय पण ती लडिवाळ नावं !! आहाहा !! कुकडी, इंद्रायणी, पवनामाई, गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, कृष्णामाई... किती नावं सांगू? सह्याद्रीच्या अवखळ लाडक्या लेकीच जणू आपल्या बा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत, नाचत, बागडत, अवघ्या मावळजनांना सुखावत आणि लहानाच्या मोठ्या होत होत आपल्या सासरी म्हणजेच सख्या सागराकडे जायला निघाल्यात !! पुढचा मान होता... ज्यांच्या आधारे सह्याद्री आपले बहू पसरून मायेने बोलावतो, त्या गडमाच्यांचा... पद्मावती, सुवेळा, संजीवनी, झुंजार, बुधला वगैरे !! कथेतल्या तान्हाजीरावांना डोणागिरीच्या कडा चढायला मदत करणारी काल्पनिक घोरपड "यशवंती" सुद्धा काही मागे राहिली नव्हती !!

आणि मग फेर धरून नाचू लागल्या... यसुदी, शारदा, शितू, साऊ, सारजा, मृण्मयी आणि अशा कितीतरी जणी !! किती गोडवा तो त्या नावांमध्ये? कोण आहेत ह्या? अगदी बरोबर !! ह्या सगळ्या म्हणजे आप्पांच्या जणू मानसकन्याच !! आप्पा... म्हणजेच दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर !! आप्पांबद्दल बोलायला गेलो तर पुन्हा एकदा विषयांतर होऊन ह्याही लेखाचं नाव बदलण्याची वेळ येईल, तेव्हा वेळीच स्वतःला आवर घालतो. मुळात म्हणजे ऋषितुल्य आप्पांचा परिचय देण्याची माझी योग्यता नाही आणि मी म्हणतो, जन्माने आणि अंतःकरणातून ज्याची नाळ ह्या महाराष्ट्रभूमीशी आणि मराठी मातीशी जोडली गेली आहे, अशा माणसाला आप्पांच्या परिचयाची गरज तरी काय? इतकंच म्हणेन की महाराष्ट्र, सह्याद्री, इथला इतिहास-भूगोल, इथले कष्टकरी लोक, त्यांची सुख-दुःख ह्यावर आयुष्यभर जीव ओवाळून टाकणारे, त्यासाठी दिवस-रात्र झटणारे आणि आपल्या अजरामर साहित्यातून ते सारं जिवंत करून माझ्यासारख्या अनेक भटक्यांनाही तीच शिकवण आणि प्रेरणा देणारे किंवा थोडक्यात म्हणजे वेड लावणारे, एकमेवाद्वितीय अवलिया म्हणजे आम्हा भटक्यांना आपले वाटणारे... "गोनीदा". तशी मला पुसटशी शंका होतीच की, नामशोधनाचं कार्य, शेवटी कुठेतरी आप्पांनी चितारलेल्या कथानकांपाशीच येऊन थांबेल.

यादी तयार झाली, आता सगळ्यात अवघड काम होतं ते म्हणजे ह्या सगळ्यातून सायकलसाठी कुठलं नाव निवडावं? मग एक एक कथानक आठवू लागलो आणि त्यातल्या कुणाचे कुठलेसे गुणविशेष सायकलशी जुळवून पाहू लागलो. आप्पांच्या कथांमधल्या सगळ्याच कथानकांचा जीव हा कुठेतरी खोलवर गुंतलेला दिसतो. मग ती राजगडावर वावरणाऱ्या वाघरावर माया करणारी यसुदी असो; पवनमावळातला धोंडी आणि पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेला आपला धाकटा दीर कोंडी ह्या दोघांचीही जीवापाड काळजी घेणारी सारजा असो, सगळ्या जणी तितक्याच तोडीच्या. खरंतर त्यांच्यात तुलना करणं आणि एकीची निवड करणं म्हणजे इतरांवर अन्याय करण्यासारखं !! एकदा वाटून गेलं की, रोज एका नवीन नावाने सायकलला संबोधावं, पण हा काही पर्याय नाही. नेटाने विचार सुरु ठेवला आणि शेवटी एका कथानकानं मला पुरतं वश करून हे शोधकार्य संपवायला मदत केली. कोण होती ही? काय असं वेगळेपण होतं तिचं? काय साम्य वाटलं मला तिच्यात आणि सायकलमध्ये? का तीच योग्य वाटली मला सायकलला नाव देण्यासाठी?

तर ही आहे आप्पांनीच चितारलेली एक दुर्गकन्या. कोणत्या गडावरची कन्या होती ही? तर साक्षात दुर्गदुर्गेश्वर रायगडावरची ही कन्या. गोनीदांचं रायगडावरचं कुटुंबच म्हणता येईल, अशा एका धनगराच्या झापात तिचा जन्म झालेला. गडाच्या कुशीतच ती लहानाची मोठी होत होती. रायगडाशी तिची लहानपणापासून गट्टी जमलेली होती, तोच तिचा बालपणापासूनचा मैतर होता. इतका घट्ट मैतर की, अगदी दाट धुक्यातही रायगडाने तिची पायवाट कधीही चुकवली नव्हती. अगदी रात्रीच्या मिट्ट अंधारात किंवा डोळ्यावर पट्टी जरी बांधली तरी रायगडावरची एक अन एक पायवाट न चुकता चालून जाईल अशी ही दुर्गकन्या. पुढे अचानक एक दिवस तिचं लग्न ठरतं आणि आपल्या सखा रायगडाला सोडून तिला लांब सासरी जाऊन राहावं लागतं. पण रायगडाच्या ओढीने तिच्या जीवाची होणारी घालमेल एक दिवस तिला संसार सोडायला भाग पाडते आणि पुन्हा एकदा, ज्या गडपुरुषालाच आपल्या अंतःकरणातून आपला सखा मानत आलेली असते, त्या रायगडाच्या कुशीत आणून सोडते, ती मग कायमचीच. तर ही आहे आप्पांची लाडकी मनू अवकीरकर. आजही ती मनू अवकीरकरीण, सध्याच्या भटक्या पिढीला दही-ताक देणारी "मनू आज्जी" म्हणून गडावर राबते आहे. 

आता तुम्ही म्हणाल ही झाली मनू आज्जीची कथा, त्याचा सायकलशी किंवा तिच्या नावाशी काय संबंध आहे? तर आहे ना !! नाही कसा !! मनू अवकीरकरीणप्रमाणे, माझ्या सायकलला जन्माने जरी इथलं म्हणता येत नसलं तरी कुठल्याश्या कारखान्यात जन्माला येऊन, तिच्या अगदी लहानपणीच ती माझ्या आयुष्यात आली आणि आज सात वर्षाची होऊन गेली आहे. ह्या सात वर्षात माझ्यासारखीच तिचीही सह्याद्रीशी, इथल्या रस्त्यांशी, इथल्या इतिहासाशी आणि ऐतिहासिक वारश्याशी गट्टी जमली आहे. त्याच्या ओढीने तीही अखंड धावत असते. माझ्या आजवरच्या सगळ्या प्रवासातली तिने दिलेली सात वर्ष ही वेगळी काढून ठेवणं अशक्य आहे. तेव्हा मनू ह्या आपल्या मानसकन्येवर आधारित, तिची कथा आप्पांनी ज्या कादंबरीमध्ये फुलवली आहे, त्या कादंबरीचं नाव म्हणजेच ह्या सगळ्या लेखनाचा सर्वोच्च बिंदू आणि सायकलला देण्यात आलेलं नाव... "रानभुली" !!!

झुलवा पाळणा !! पाळणा !! रानभुलीचा !!

आहे की नाही मग हे एक अनोखं (विचारांचं) प्रवासवर्णन? मला तरी तसंच वाटतं. तर माझ्या ह्या रानभुलीच्या बारश्यामागचा अनोखा प्रवास आणि त्या नावामागची  वाटणारी कहाणी इथेच सुफळ संपन्न होत आहे.

स्मरणयात्रा रानभुलीची:

मला स्वतःला जरी प्रकाशचित्रात बंदिस्त होण्याची आवड नसली तरी रानभुलीला मात्र त्याची फार हौस आणि तिची ही हौस मात्र मी न कंटाळता पुरवतो. रानभुलीच्या आजपर्यंतच्या काही मोजक्या आठवणींचा हा चित्ररूपी मागोवा आपल्या सर्वांसाठी !!

टीप:

लिखाण जरी सायकल डोळ्यासमोर ठेऊन केलेलं असलं तरी, मोटारसायकल ही देखील माझ्या दृष्टीने (मोटार बसवलेली) एक सायकलच आणि तीही तितक्याच मायेची, तेव्हा "रानभुली" हेच नाव मी दोघींसाठी वापरेन.

१३-नोव्हेंबर-२०२०: रानभुलीसोबत एक रम्य सकाळ आणि अनोखं सूर्यदर्शन

१-फेब्रुवारी-२०१५: इथेच रानभुलीची सह्याद्रीशी गट्टी जमली

१३-सप्टेंबर-२०२०: रानभुलीचं कुंडमळा दर्शन

२५-ऑक्टोबर-२०२०: तुकोबारायांच्या चरणी दंडवत

१-नोव्हेंबर-२०२०: माउलींच्या दारी उभी क्षणभरी

२८-नोव्हेंबर-२०२०: आपल्या सखीसोबत कासारसाई धरण भेट

२-जानेवारी-२०२१: अजून एका सखीसोबत रम्य आणि शांत ठिकाणी

२८-जून-२०१४: फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या !!! पहिल्या रानभुलीची नाणेघाटातली आठवण !!!

२६-जानेवारी-२०२०: मांजरसुभ्याच्या पायथ्याशी कोवळं ऊन पिणारी रानभुली

३०-नोव्हेंबर-२०२०: कैलासगडाच्या पायथ्याशी रानभुलीचं मनमोहक रूप

कृतज्ञतापूर्वक अर्पण:

माझ्या अंतःकरणात बालपणीच रुजलेल्या 'सह्याद्रीवेड'रुपी रोपट्याला, सह्याद्रीवरील विविधांगी मायेचं आणि ह्या मातीतल्या इतिहासाचं खतपाणी घालून वाढवणारे "आप्पा - दुर्गमहर्षी गो नी दांडेकर" ह्यांना आणि माझ्या आयुष्यातल्या वरील चित्रांतील सर्व "रानभुलींना" हे लिखाण समर्पित. प्रत्यक्ष आप्पांचा सहवास काही मला लाभला नाही पण त्यांच्या साहित्यातून आणि माझ्या आयुष्यात आलेल्या ह्या रानभुलींच्या रूपाने इथून पुढे आप्पा मला कायम भेटत राहतील... हा सह्याद्री आणि इथला इतिहास त्यांच्या नजरेतून मला दाखवत राहतील !!!

अत्यंत महत्त्वाचं असं काही:

माझ्या मराठी बांधवांनो... चला...
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
  • निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
  • हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
  • अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
  • आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.

तळ टीप:

वाचकहो !!
  • मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून एक सर्वसामान्य हौशी भटक्या आहे. लिखाणातली माहिती ही लेखाखाली दिलेले संदर्भ आणि माझ्या प्रवासानुभवांच फलित आहे, तेव्हा जाणकारांनी, ह्या लिखाणात शक्य असणाऱ्या त्रुटी/चुकां बद्दल मला क्षमा करून, जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
  • मी कोणी सिद्धहस्त लेखकही नाही, तेव्हा माझ्या अल्पमतीला सुचलेलं माझं हे बाळबोध लिखाणही आपण मोठ्या मनानं गोड मानून घ्यावं.

टिप्पण्या

  1. रानभुली वरचं आणि सह्याद्री वरचं तुझं प्रेम प्रत्येक वाक्यात जाणवतं, अतिशय नम्र लिखाण, नक्कीच मराठीचा वारसा जपणारं लिखाण, ओढ लावणारं लिखाण

    उत्तर द्याहटवा
  2. Prasad tuzi ni Ranbhulichi katha va parach ranjak,v tarunansathi bodhak aahe,
    Chan lihitos tu
    Ha tuza supta gun sahydrinech tula jaaga karun dila aahe vatate
    Ajun vachala aavadale asate pan eatake barik vachala tras hoto aso
    Go ahead , keep it up

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संपले बालपण माझे

सायकलवारी अल्पपरिचित लेण्यांची

ओढाळ वासरू रानी आले फिरू

सायकलानुभव - संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर

दोन दिवस सहा किल्ले

आणि स्मृतीस्थळ बोलतं झालं !!!

खलिता कोंडेश्वराचा... निरोप भिमाशंकराला...